संग्रहित फोटो
कणकवली : कणकवली शहरातील डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे. या गृहनिर्माण प्रकल्पातील ३० मीटर अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात न घेता अचानक परस्पर बदलले. दरम्यान, ही बाब ग्राहकांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , नगरसेविका मेघा गांगण यांच्या कानी घातला. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता संबंधित कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
नागरिकांच्या एकजुटीमुळे काढून टाकण्यात आलेले जुने तीस जुने मीटर पुन्हा पूर्ववत बसविण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडण्यात आले. यावेळी कलमठ ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, सचिन खोचरे, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर यांच्यासह डीसपी गार्डनमधील नागरिक, तसेच अदानी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि वीजवितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी स्मार्ट मीटरला दर्शविला विरोध
कणकवली शाळा नं.५ नजीकच्या डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील नागरिकांचे महावितरण कंपनीकडून नेमलेल्या अदानी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना अनेक ग्राहकांना याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. तसेच स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीजबिलात वाढ होण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी स्मार्ट मीटरला विरोध दर्शविला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
योजनेबाबत सविस्तर माहितीची मागणी
घटनास्थळी नागरिक जमा झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांकडे या योजनेबाबत सविस्तर माहितीची मागणी केली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक अधिक आक्रमक झाले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर नागरिकांच्या दबावामुळे आधीच काढून ठेवलेले सुमारे तीस जुने मीटर पुन्हा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेत, ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि योग्य जनजागृती न करता कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला. तसेच शासन व वीज वितरण कंपनीने प्रथम नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : २३ गावांचा विकास आराखडा आता पुणे महापालिका तयार करणार; ५ वर्षांची प्रतीक्षा संपणार?
कणकवलीतील चार हजार मीटर कसे बदलले ?
कणकवली शहरात चार हजार ग्राहकांचे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. हे मीटर बसवताना ग्राहकांचा अर्ज घेतला आहे का? असा सवाल मेघा गांगण यांनी केला. त्यावेळी कंपनीचे प्रतिनीधींनी अर्ज घेतल्याचे सांगितले. त्यावेळी ग्राहकांच्या संमत्तीशिवाय कणकवली शहरात स्मार्ट मीटर लावू नका, असा इशारा अण्णा कोदे यांनी दिला आहे.






