शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी
अनियमित पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे दुहेरी संकट ओढवले आहे. तालुक्यातील गावंडगाव येथील शेतकरी प्रशांत सदाशिव देशमुख व सुषमा प्रशांत देशमुख यांच्या सहा एकरांतील तुरीचे पीक रानडुकरे आणि हरणांच्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त केले. दुबार पेरणी करूनही पीक वाचवता न आल्याने त्यांचा संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला असून, वनविभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. देशमुख दाम्पत्याने मोठ्या आशेने सहा एकर क्षेत्रात तुरीची पेरणी केली होती. मात्र, अनियमित पावसामुळे पीक उगवण्यास विलंब झाला. त्यातच रानडुकरांनी शेतात घुसून जमिनीत पेरलेले बियाणे उकरून फस्त केले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही त्यांनी अतिरिक्त खर्च करून दुबार पेरणी केली.(फोटो सौजन्य – istock)
काही दिवसांनी तुरीची रोपे जोमाने उगवू लागली. मात्र, त्याचवेळी हरणांच्या कळपाने शेतात धुमाकूळ घालत संपूर्ण पीक कुरतडून टाकले. हाती येण्याच्या मार्गावर असलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट झाल्याने देशमुख कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता शेतकऱ्यांना दिवस-रात्र शेतात मुक्काम करून पिकांची राखण करावी लागत आहे. तरीही रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या प्राण्यांना कोणतीही इजा करता येत नसल्याने नुकसान मुकाट्याने सहन करावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात सध्या वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. रानडुकरे, हरणे, काळवीट आणि नीलगायींच्या कळपांकडून तूर, सोयाबीन, कापूस तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे पिकांचे संरक्षण करणे कठीण बनले असून, शेतकऱ्यांना रात्रभर शेतात मुक्काम करून राखण करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने पेरणी आणि दुबार पेरणी केली असतानाही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत.
अनियमित पावसामुळे पहिली पेरणी अयशस्वी
रानडुक्करांनी बियाणे उकरून फस्त केले
अतिरिक्त खर्च करून दुबार पेरणी
उगवलेले पीक हरणांच्या कळपाने कुरतडले
सहा एकरांतील तुरीचे मोठे नुकसान






