ठाण्यात भीषण अपघात! भरधाव कार ट्रकवर आदळली (Photo Credit- X)
अपघातातील सर्व तरुण एका नामांकित आयटी (IT) कंपनीत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आपले काम संपवून कार्यालयातून घरी परतत असताना हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे 3 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास खारेगाव टोल प्लाजाजवळील एका पेट्रोल पंपापाशी ही घटना घडली.
पहाटेच्या वेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार पुढे चाललेल्या एका ट्रेलर ट्रकच्या मागील भागावर जाऊन जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि चालक दीपक पाटेकर कारच्या आतच अडकून पडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या मदतीने चालकाला बाहेर काढले.
अपघातात ठार झालेला चालक दीपक पाटेकर (वय २६, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याला तातडीने कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारमधील इतर चार तरुण, ज्यांचे वय 20 ते 23 वर्षांच्या दरम्यान आहे, ते गंभीर जखमी झाले आहेत. हे चौघेही डोंबिवलीचे रहिवासी असून त्यांच्यावर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
अपघाताची भीषणता पाहून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. खारेगाव टोल नाका परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






