सौजन्य - नवराष्ट्र टीम
राजेगाव/ विठ्ठल मोघे : दोन्हीही ट्रॉलीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस..चढाचा खडबडित रस्ता…मग रस्ता पार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मुंडक्याची जीवघेणी कसरत…हे सगळं भयानक! अनेक गर्दीच्या रस्त्यावरचे चित्र पाहून ओव्हरलोड ऊस वाहतुकीतून पैसा मिळवायचा की मृत्यू? हा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहत नाही.
राजेगाव परिसरातील असंख्य गावांतील हजारो हेक्टर ऊस कर्जतसह बारामती, इंदापूर, दौंड आदी साखर कारखान्यांवर गाळपासाठी जातो. मात्र या ऊसाची शेतापासून-कारखान्यापर्यंत सुरू असलेली जीवघेणी वाहतूक अंगाचा थरकाप उडवणारी आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ठरवून दिलेल्या वाहतूक क्षमतेत अधिकचा फायदा होत नाही, त्यामुळे अतिरिक्त वाहतुकीतुन जास्त रकमेचा मोबदला कसा मिळेल? या आशेपोटी ट्रॅक्टर व ट्रकचालक स्वतःच्या जिवाबरोबरच इतरांच्या जीविताशी खेळ खेळताना दिसत आहेत. शेतातील पाणंदरस्ते असो किंवा राज्यमार्ग असो रस्त्यावर वाहनांची गर्दी असली तरी चढाचे अंतर पार करताना ट्रॅक्टरसारख्या शक्तिशाली निर्जीव वाहनाला बेशिस्त पद्धतीने हाकले जाते.
टार्गेट पूर्ण करण्यासाठी ओव्हरलोडचे संकट
चालकाच्या चुकीमुळे अनेकवेळा थोड्याशा हेलकाव्यामुळे ऊसाच्या भरलेल्या ट्रॉल्या रस्त्यावर अंग टाकून देतात आणि या अपघातात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या निष्पापांचा बळी जातो. क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहनात भरल्याने अनेकवेळा या ट्रॉली पलटी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ऊस वाहतूकदार व टोळीचालक आपले वार्षिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी ओव्हरलोडचे संकट उराशी बांधतो. कर्जत- बारामती या राज्यमार्गावर तर ठिकठिकाणी ऊसाचे ढिग रस्त्यावर पडलेले दिसून येतात. अनेकवेळा ऊसाची ही जड वाहने रस्त्याच्या मध्य भागातून सुसाट नेली जातात. त्यामुळे कारखाना व्यवस्थापणाने ओव्हरलोड वाहतुकीस बंदी आणून शेतकऱ्यांचे नुकसान आणि अपघातांचे प्रमाण रोखावे, अशी अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा : ‘त्या’ युवकाचा खून करणाऱ्या तिघांना बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
आडदांडपणा अनेकांच्या जीवाशी बेतणारा
“अनेक गावांतील ऊस टोळी चालकांकडून ऊस वाहतुकीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जणू स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. यंदाच्या हंगामात ऊस वाहतूकदार सिझनला सर्वात जास्त कोण सरस ठरणार? हा मान मिळवण्यासाठी ओव्हरलोड वाहतुकीला प्रोत्साहन दिले जाते. ‘नाद करा पण आमचा कुठं’? हा आडदांडपणा अनेकांच्या जीवाशी बेतणारा आहे”.
शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला
शिरूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवरून जाणाऱ्या अवजड ऊस वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. उंचच्या उंच भरलेले उसाचे ट्रक, बेशिस्त वाहनचालकांची बेफिकीर वागणूक आदींमुळे अष्टविनायक महामार्ग व परिसरातील रस्ते अपघातांचे केंद्र बनत आहेत. याकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.