Two Murders In One Day In Pune City A Case Has Been Registered By The Police Nrdm
पुणे शहरात एका दिवसात दोन खुनाच्या घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुणे शहरात एका दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली असून, दोन तरुणांचे डोक्यात दगड घालून खून करण्यात आले आहेत. अगदी शुल्लक कारणावरून कात्रज आणि पर्वती भागात या घटना घडल्या आहेत.
पुणे : पुणे शहरात एका दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली असून, दोन तरुणांचे डोक्यात दगड घालून खून करण्यात आले आहेत. अगदी शुल्लक कारणावरून कात्रज आणि पर्वती भागात या घटना घडल्या आहेत.
पहिली घटना सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील दत्तनगर भागात घडली आहे. यातील आरोपीचा शोध लागलेला नाही. विलास बांदल (वय ५४, रा. वंडरसिटी शेजारी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांदल हे भाजी विक्रेते आहेत. ते मार्केटयार्ड परिसरात भाजी विक्रीचा व्यावसाय करत होते. राहण्यास कात्रज येथील वंडरसिटीच्या जवळ होते. सकाळी ते दत्तनगर येथील एका हॉटेलातून नाष्टा करून राजमाता भुयारी मार्गाच्या वरच्या बाजूने जात असताना रिक्षातून आलेल्या एकाने पाठिमागून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. याची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या खूनाची घटना ताजी असताना दुपारी लक्ष्मीनारायण थेटरजवळील भुयारी मार्गात दारूड्याचा धक्का लागल्यानंतर आईवरून शिवीगाळ केल्यावरून एका फिरस्त्याचा खून करण्यात आला. भुयारी मार्गात नेऊन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गौतम घनश्याम तुरूकमारे (वय २८, रा. माजलगाव) याला ताब्यात घेतले आहे. याघटनेत खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Web Title: Two murders in one day in pune city a case has been registered by the police nrdm