मुंबई – “मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र्य पाळायलाच हवे. उद्या मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे. सभागृहात शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल आपले आभार”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं कौतुक केलं. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी झापलं होतं. नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरेंच्या हस्ते कऱण्यात आलं आहे. या पुस्तकात गोऱ्हेंच्या उपसभापती पदाच्या कार्याचा अहवाल देण्यात आला आहे.
“सभागृहाची एक उंची आहे. तिथे कसं वागलं पाहिजे, याचे काही नियम आहेत. मग तो मंत्री असो वा कुणी असो.. सभागृहात आल्यावर त्याने शिस्तीत वागलं पाहिजे. हे खडसावून सांगितलं, शिस्तीचा आग्रह धरल्याबद्दल तुमचे खरं तर आभार. तो कोण होता, म्हणून तुम्ही त्याला खडसावलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देत नाही. तुम्ही ज्या पदावर बसलात त्याला न्याय देताना सभागृहाची उंची पाळून संबंधिताला योग्य शब्दात समज दिली गेलीच पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.