Digital Payments
नागपूर : ग्रामपंचायतींसाठी मालमत्ता कर (Propery Tax) आणि पाणीपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. या करस्वरूपात गोळा होणाऱ्या महसुलावरच गावांचा विकास अवलंबून असतो. पण, मोठ्या संख्येने ग्रामस्थ कराचा भरणा टाळतात. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार चालविणे तारेवरची कसरत ठरते.
कराचा भरणा वाढावा यादृष्टीने अत्याधुनिक स्वरूपाच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणऊन ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे कर भरणा करता येऊ शकतो. या पद्धतीने रांगेत तात्कळत उभे राहण्याचे कष्ट आणि वेळही वाचणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये 764 ग्रामपंचायत असून, त्याअंतर्गत सुमारे दीड हजारांवर गावांचा समावेश आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून येणारी रक्कम ग्रापंच्या सामान्य फंडात जमा होते. त्यातुन गावातील विकास कामांसोबतच इतरही महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येतो. पण, ग्रापंमध्ये जाणे, रांगेत लागणे, रोख भरणा करण्यासाठी बँकेतून पैसे काढून आणणे ही बाब काहीशी कंटाळवाणी ठरते. त्यामुळेच शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय साध्य होत नाही. सर्वत्र डिजिटल पेमेंटव्दारेच पेसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर ‘महा-ईग्राम ॲप’ च्या माध्यमातूनही नागरिक ग्रापंकडे कराचा भरणा करू शकतात.
यासोबतच आता प्रत्येक ग्रापला डिजीटल पेमेंटसाठी ‘क्युआर कोडही उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांचा कर भरणा करतानाचा वेळ, परिश्रम आदींची बचत होणार आहे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये हे क्युआर कोड लावण्यातही आले असल्याची माहिती आहे.