मुंबई– काल गुरुवारी संपूर्ण देशभरात प्रभू श्रीराम नवमी (Ram Navami) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देशासह राज्यातल्या विविध मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तर श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत मोठा उत्साह साजरा करण्यात आला. राम नवमी मोठ्या धूमधडक्या साजरी करा, असं गुढी पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. मात्र स्वत: राज ठाकरे राम नवमीला भारतात नव्हते तर, ते परदेशात होते. यावर मविआतील (MVA) नेत्यांनी टिका केली आहे.
उंटावरून शेळ्या हाकणारे…
दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, काही लोक कार्यकर्त्यांना आदेश देतात पण स्वतः त्याचं पालन करत नाहीत. राज ठाकरेंनी राम नवमी साजरी करा, असे कार्यकर्त्यांना आदेश दिले होते, मात्र ते परदेशात होते. अशा लोकांना आमच्या गावाकडचे लोक ‘उंटावरून शेळ्या हाकणारे’ असं म्हणतात. म्हणजेच केवळ कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे आणि स्वतः मात्र त्याचं पालन करायचं नाही. अशाच काळात या लोकांचे खरे चेहरे उघडे पडतात. अशी टिका सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर केली आहे.
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले.
त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे…
याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनका l
कौआ मोती खायेगा ll”— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 30, 2023
मिटकरी यांचे खोचक ट्विट
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून टिका केली आहे. “रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे… याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनका l कौआ मोती खायेगाll” असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.