(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भव्य रंगमंच, झगमगती रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि मंत्रमुग्ध करणारे वातावरण… या सगळ्यांच्या साक्षीने ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील खास प्रसंगाचे भव्य सादरीकरण करण्यात आले. भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला भवानी तलवार आणि घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार रंगमंचावर अवतरताच उपस्थितांमध्ये प्रचंड जल्लोष उसळला.
शिवकालीन इतिहासातील अत्यंत गौरवशाली आणि अभिमानाने कोरलेला अध्याय असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आग्रा भेट या भव्य चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. महाराजांचे शौर्य, धैर्य, नेतृत्व आणि रणनिती यांचे प्रभावी दर्शन या चित्रपटात घडणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या लेखन-दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, शिवकालीन इतिहास मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार असल्याने अपेक्षा शिगेला पोहोचल्या आहेत.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या शिवराज अष्टकातील सहावे पुष्प असलेल्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथमदर्शन यावेळी उपस्थितांना अनुभवता आले. या चित्रपटात छत्रपती शिवरायांच्या रूपात नव्या दमाचा उमदा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.
या चित्रपटातील ‘महारुद्र शिवराय’ गीताचे दमदार सादरीकरण यावेळी करण्यात आले. दिग्पाल लांजेकर यांनी हे गीत लिहिले असून अवधूत गांधी, अमिता घुगरी यांचा स्वरसाज गीताला लाभला आहे. अवधूत गांधी आणि मयूर राऊत यांचे संगीत गीताला लाभले आहे. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. ‘मुगाफी पल्स’ हे अॅप्लिकेशन वापरून या चित्रपटाच्या पटकथेचे विश्लेषण करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. या भेटीतून त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक दिसली. महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते म्हणून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार आणि मुरलीधर छतवानीयांची नावे आहेत. तर रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.या ऐतिहासिक चित्रपटाचे वर्ल्ड वाईड वितरण पॅनोरमा स्टुडिओज करणार असून, जागतिक स्तरावर मराठी इतिहासाची भव्य मांडणी पाहायला मिळणार आहे.






