विरोधी पक्षनेतेपदावरून संघर्ष? ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा आता पक्षफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चर्चा रंगली आहे. या पदासाठी कोकणातील एक वरिष्ठ नेते इच्छुक होते. मात्र मातोश्रीने दुसरेच नाव पुढे केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात आणखी एक फूट पडण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य फुटीवरून भाजप-शिवसेनेतही तीव्र मतभेद उफाळल्याचे वृत्त आहे.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन आणि राजकीय भूकंप समीकरण बनले आहे. यंदाही विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर कोकणातून शिवसेनेचा एक ‘पावरफुल’ नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे यांचं पुत्र प्रेम की ‘मातोश्री’ सोबत एकनिष्ठ राहिलेला कोकणातील नेता…नेमकं ठाकरेंच्या मनात काय आहे? विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची निवड होणार? हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.
शिवसेना ठाकरे यांच्या आमदारांना भाजपने प्रवेश देऊ नये, असा आग्रह शिंदे गटाने केला आहे. मात्र पक्षप्रवेश अटळ असेल, तर हे आमदार भाजपमध्ये नव्हे तर शिंदे गटाच्या शिवसेनेत यावेत, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. ठाकरेची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असलेले हे आमदार भाजपमध्येच जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे यावर तोडगा कसा काढावा, या संकटात भाजप नेते असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा अंतिम फैसला आता दिल्लीतून होण्याची शक्यता आहे.
शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ‘मातोश्री’ची ताकद कमी झाली. उद्धव ठाकरे यांना अनेक विश्वासू सहकारी सोडून गेले. अशा कठीण परिस्थितीतही कोकणातील हा नेता ‘मातोश्री’ सोबत एकनिष्ठ राहिला. सत्ताधाऱ्यांच्या आक्रमणाला पुरूनही उरला. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देऊन त्यांना योग्य मान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. अचानक या पदासाठी आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे ते १० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.






