Vidhan Parishad Elections 2026: प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर..; अहिल्यानगर विधानपरिषदेची बदलणार समीकरणे
अहमदनगर विधान परिषदेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे.पण प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य अरूण जगताप यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली. त्यांच्या या जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या जागेवर अरुण जगताप यांचे पुत्र सचिन जगताप यांनीदेखील दावा केला आहे. त्यासाटी त्यांनी उमेदवारी अर्जही घेतल्यान चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, या जागेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपचे सत्यजित कदम यांनी विधान परिषदेवर दावा केला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यंना संधी द्यावी, अशी मागणी सत्यजित कदम यांनी केली आहे. याशिवाय राम कदम यांनीदेखील निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत दिल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे अहिल्यानगर निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवली तर या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खास बाब म्हणजे प्रवीण पोटे पाटील यांना सलग तिसऱ्यांदा त्यांना संधी देण्यात आली असून यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीला २९ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन असले तरी आता प्रवीण पोटे पाटील १ जून रोजी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.






