Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर 'इंडिया'चा आक्रमक पवित्रा
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि इतर विरोधी खासदारांसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात सीजेपी आंदोलकांवरील पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिरातील प्रसादाची चोरी आणि इतर मुद्द्यांवरून निषेध करण्यासाठी २० जुलै रोजी प्रेरणा स्थळ येथील गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, काँग्रेसने सोशल मीडिया अकाऊंटवरूनही अमित शहांसह केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्नांचा मारा केला आहे. “तुम्ही मुलांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश का दिले?, मुलांवर एके-४७ ने गोळ्या का झाडण्यात आल्या? पावसाळी अधिवेशन १३ दिवसांपासून सुरू आहे—अमित शाह सभागृहात का येत नाहीत? एवढी भीती का?” असे प्रश्न विचारून काँग्रेसने अमित शहांवर हल्लाबोल केला आहे.
गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना अमित शांहांवर गंभीर आरोपही केले होते. अमित शाहांच्या आदेशाने विद्यार्थ्यांना निर्दयी लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला,असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी, २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि बळाच्या वापरासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत काही गंभीर आरोप केले होते. “शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी अंदाधुंद बळाचा वापर केला आणि यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली होती.
तसेच, विद्यार्थी एका निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण प्रणालीची मागणी करत होते, परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रे आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आणि महिला आंदोलकांनाही कथितरित्या वाईट वागणूक देण्यात आली. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात पेलेट गनच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित होणारे व्हिडिओ गंभीर दुखापती दर्शवतात. त्यांनी १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोछाबचा उल्लेख केला असून, तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका जखमी पत्रकाराचाही उल्लेख केला होता.
राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांना दोन थेट प्रश्न विचारले. पहिला, त्यांनी विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? नसेल तर, कोणी दिली होती? दुसरा, आंदोलनादरम्यान साध्या वेशात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक पोलीस होते की स्वयंसेवक, आणि त्यांना कोणाच्या आदेशाने तैनात करण्यात आले होते? अे अनेक सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.






