स्मृती मानधना आणि जेमिमा रोड्रिग्स(फोटो-सोशल मीडिया)
DC vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज १५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने येणार आहे. हा सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी येथे शानदार फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध प्रत्येक विभागात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सवर सात विकेट्सने विजय मिळवत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. या विजयासह दिल्ली चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मात्र, या टप्प्यात अजिंक्य असलेल्या आरसीबीला हरवण्यासाठी दिल्लीला आपला खेळ आणखी उंचावावा लागेल.
हेही वाचा : IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…
आतापर्यंत दिल्लीच्या फलंदाजीची धुरा अनुभवी लिजेल ली (२१३ धावा) हिने सांभाळली असून लॉरा वोलवार्ट (१२३) आणि शेफाली वर्मा (१४९) यांनी तिला वेळोवेळी साथ दिली आहे. जेमिमा रोड्रिग्सची फॉर्म मात्र चिंतेचा विषय ठरली होती. मात्र, मुंबईविरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद अर्धशतक झळकावत आत्मविश्वास मिळवला असून आरसीबीविरुद्ध ही तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजी विभागातही दिल्लीला काही त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा हिने आतापर्यंत पाच सामन्यांत ८.७ इकॉनॉमीने १० बळी घेत गोलंदाजीची आघाडी घेतली आहे. मात्र, फिरकीपटू श्री चरणी आणि स्नेह राणा अद्याप लयीत आलेल्या नाहीत.
दक्षिण आफ्रिकेची अनुभवी वेगवान गोलंदाज मरिझान काप हिने चार बळी घेतले असले तरी तिचा प्रभाव मर्यादित राहिला आहे, जरी तिची ५.२५ ची इकॉनॉमी उल्लेखनीय आहे. आरसीबीकडे फलंदाजीमध्ये कर्णधार स्मृती मंधाना आणि ग्रेस हॅरिस यांची भक्कम सुरुवात मिळत आहे. मधल्या आणि खालच्या फळीत नादिन डि क्लर्क आणि ऋचा घोष सातत्याने योगदान देत आहेत. गुजरात जायंट्सविरुद्ध ७३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या गौतमी नाईकने आरसीबीच्या फलंदाजीला आणखी बळ दिले आहे.
आरसीबीची गोलंदाजीही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. सयाली सतघरे, डि क्लर्क, लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटील सातत्याने बळी घेत असून पाच सामन्यांत त्यांची इकॉनॉमी अनुक्रमे ८, ६.९, ५.४ आणि ८.९ अशी आहे. आधीच १० गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलेल्या आरसीबीला हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत थेट अंतिम फेरीकडे वाटचाल करायची आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मंधाना (कर्णधार), ऋचा घोष, श्रेयंका पाटील, जॉर्जिया वोल, नादिन डि क्लर्क, राधा यादव, लॉरेन बेल, लिंडसे स्मिथ, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, ग्रेस हॅरिस, गौतमी नाईक, प्रत्युषा कुमार, डी हेमालता, सयाली सतघरे.
दिल्ली कॅपिटल्स: जेमिमा रोड्रिग्स (कर्णधार), शेफाली वर्मा, मरिझान काप, निकी प्रसाद, लॉरा वोलवार्ट, चिनेल हेन्री, श्री चरणी, स्नेह राणा, लिजेल ली, दिया यादव, तानिया भाटिया, ममता मडिवाला, नंदिनी शर्मा, लुसी हॅमिल्टन, मीनू मणी, अलाना किंग.






