या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आक्रमक निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना हरमनप्रीत म्हणाली, “एजबेस्टनची ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे. आमचा संपूर्ण संघ या महामुकाबल्यासाठी प्रचंड उत्सुक असून, मागील वर्ल्ड कपमधील उत्कृष्ट कामगिरीतून मिळालेला आत्मविश्वास आम्ही या सामन्यातही पुढे नेण्यास सज्ज आहोत.”
No handshake 🤝 #IndvsPak pic.twitter.com/I9nwlitISN — Sports central (@cricpulseHQ) June 14, 2026
मात्र, आपले मत मांडल्यानंतर हरमनप्रीत कौर पाकिस्तानी संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन न करताच थेट खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला निघून गेली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांनुसार आणि परंपरेनुसार टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात.
भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यांमध्ये एकमेकांशी हात न मिळवण्याचा हा सिलसिला अजिबात नवीन नाही. या धोरणाची अधिकृत सुरुवात मागील वर्षी झालेल्या पुरुषांच्या आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेदरम्यान झाली होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. दोन देशांमधील सीमाभागातील वाढता तणाव आणि राजकीय संबंधांचा विचार करता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतर्गत स्तरावर ही भूमिका घेतल्याचे बोलले जाते.
भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघांनी या धोरणाचे अत्यंत कडकडीत पालन केले आहे. चालू महिला वर्ल्ड कपपूर्वी, अंडर-१९ वर्ल्ड कप, राइजिंग स्टार्स आशिया कप आणि पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध मैदानात हीच आक्रमक भूमिका घेतली होती, जी आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम ठेवली आहे.






