वर्ल्ड कप २०२३ : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आतापर्यत ६ सामने झाले आहेत. आज १० ऑक्टोबर रोजी दोन सामने खेळवले जाणार आहेत. बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना धर्मशाला येथे सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दुपारी २ वाजता हैदराबाद येथे होणार आहे. जसजसा वर्ल्ड कपचे सामने पार पडत आहेत तसतशी मजा वाढत आहे. त्याचबरोबर या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील आतापर्यंतच्या गुणतालिकेची स्थिती अत्यंत गमतीशीर आहे.
आतापर्यंत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांग्लादेशचे संघ गुणतालिकेमध्ये टॉप-४ मध्ये आहेत. न्यूझीलंड संघ, आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर, ४ गुण आणि +१.९५८ च्या निव्वळ धावगतीने क्रमांक-१ वर कायम आहेत. दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्याने एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या करून श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला आणि २ गुणांसह +२.०४० चा उत्कृष्ट निव्वळ रन रेट देखील मिळवला. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने नेदरलँड्सविरुद्ध पहिला सामना जिंकून २ गुण मिळवले होते, आता आज पाकिस्तानचा दुसरा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेश संघ या यादीत चौथ्या स्थानावर आहे, ज्याने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करून २ गुण मिळवले होते. आज बांग्लादेशचा दुसरा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
भारत सध्या विश्वचषकाच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, त्याने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून २ गुण आणि +०.८८३ चा निव्वळ धावगती मिळवली आहे. त्याच वेळी, भारताच्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या स्थानावर आहे, ज्याचे खाते अद्याप पॉइंट टेबलमध्ये उघडलेले नाही, परंतु नेट रन रेट इतर संघांपेक्षा चांगला आहे. यानंतर अफगाणिस्तान, नेदरलँड आणि श्रीलंका हे संघ शून्य गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. शेवटच्या स्थानावर म्हणजे दहाव्या स्थानावर इंग्लंड आहे, जो हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो आणि सध्याचा चॅम्पियन संघ आहे.