महाराष्ट्राला पावसाचा इशारा (फोटो -ai gemini)
मुसळधार पावसाने पुणे शहराचे जनजीवन विस्कळीत
पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली
एकता नगर परिसरात शिरले पाणी
पुणे/सुनयना सोनवणे: दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने पुणे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी (ता. ३१) घाट विभाग आणि धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. परिणामी मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन भिडे पूल पाण्याखाली गेला, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर शहरातील अनेक सखल भाग जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, शनिवारी (ता. १) शहरात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली, तरी पुणे जिल्ह्याच्या घाट विभागासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भ व लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता दुर्बल होत पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने सरकत आहे. या प्रणालीचा महाराष्ट्रावरील प्रभाव शनिवारी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता असली, तरी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असली, तरी घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. शनिवारी पुणे शहरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र घाट विभागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा कायम असल्याने नदीकाठ, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Pune Rain: सावधान बाहेर संकट उभं आहे! खडकवासल्यातून 43 हजार क्यूसेकने विसर्ग; पुढील काही तास…
पुण्यातील पावसाची नोंद
केंद्र – पाऊस (मिमी)
पाषाण – ३४.०
शिवाजीनगर – २९.८
चिंचवड – २८.५
मगरपट्टा – २३.०
लोहेगाव – १९.०
लवळे – ०.०
एनडीए – ०.०
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम विदर्भ व लगतच्या दक्षिण मध्य प्रदेशावरील चक्रीय स्थितीपर्यंत द्रोणी सक्रिय आहे. त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत अपतटीय द्रोणी कायम आहे. या प्रणालींमुळे राज्यात सर्वत्र पावसासाठी पोषक परिस्थिती असून कोकण व मध्य महाराष्ट्रासाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
एकतानगरात पाणी; सात रोहित्रांचा वीजपुरवठा बंद
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर शुक्रवारी दुपारी हिंगणे शाखेअंतर्गत पेशवे पार्क उपविभागातील एकतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून पूजा पार्क, शरद सरोवर, आनंद पार्क, कुदळे पाटील, राधाकृष्ण रेसिडेन्सी, द्वारका आणि गायत्री अपार्टमेंट या सात रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केला. पाणी ओसरल्यानंतर परिसराची पाहणी करून सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
भिडे पूल पाण्याखाली; वाहतूक बंद
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक भिडे पूल पाण्याखाली गेला. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पाणी ओसरेपर्यंत नदीपात्र आणि पुलाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी –
शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालयीन वेळेत पाऊस आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, शनिवार पेठ, डेक्कन आणि मध्यवर्ती भागातील प्रमुख मार्गांवर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा –
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः नदीपात्रात सराव करणाऱ्या ढोल पथकांनी सतर्क राहून सराव टाळावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नदीपात्रात उतरू नये, पाण्याजवळ गर्दी करू नये आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.






