फोनवर अलर्ट वाजताच घाबरले लोकं... सुरु झाला गोंधळ, काय आहे नेमंक कारण? सरकारनेच केलं जाहीर
तुमच्या फोनवर देखील सायरन वाजल्याचा आवाज आला का? तुमच्या मनात देखील गोंधळ उडाला का? आता काय होणार, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात देखील आले आहेत का? घाबरू नका. ही केवळ एक चाचणी आहे. सरकारने आधीच जाहीर केले होते की, ‘आज 2 मे रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाच वेळी अलर्ट वाजणार आहे. ही केवळ एक चाचणी असून घारबून जाण्याची गरज नाही.’
मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका… सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी
सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणेच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देशातील सर्व नागरिकांच्या फोनवर एकाचवेळी सायरन वाजला. असे एकदा नाही तर दोन वेळा घडले. अचानक सायरन वाजल्याने अनेकजण घाबरले होते. फोन अचानक वायब्रेट झाल्याने लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता निर्माण झाली होती. मात्र काहीवेळाने सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, तुमच्या फोनवर वाजलेला सायरन ही केवळ एक चाचणी आहे. यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही.
एसएमएसद्वारे मोबाईलवर आलेल्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत मेसेज आले होते. मेसेजमध्ये लिहीले आहे की, भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे. -भारत सरकार
एसएमएससोबतच एक व्हॉईस मेसेज देखील जारी करण्यात आला होता. हा संदेश भारत सरकारद्वारे ‘सेल ब्रॉडकास्ट’ नावाच्या प्रणालीचा वापर करून पाठवला जातो. भूकंप, पूर, चक्रीवादळ इत्यादींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना त्वरित सावध करण्यासाठी याची रचना केली आहे. या अलर्टमध्ये “अत्यंत गंभीर इशारा” असे म्हटले आहे, कारण खऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी हीच श्रेणी वापरली जाते. परंतु त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही केवळ एक चाचणी आहे. मेसेज पाहून घाबरून जाण्याचा गरज नाही.
दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) ने विकसित केलेली एकात्मिक सूचना प्रणाली (साचेट) एनडीएमएने यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने शिफारस केलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (सीएपी) वर आधारित आहे. भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीद्वारे मोबाईल यूजर्सना एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित सूचना पाठवल्या जातात.






