(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India GDP Growth: जागतिक स्तरावर फोफावलेली परिस्थिती आणि त्यामुळे महागाईचा वाढता भडका याचा परिणाम कुठेतरी देशाच्या विकास दरावर दिसून येतो हे निश्चित आहे. पण भारताची सध्याची परिस्थिती तशी नसल्याचं स्वतः अर्थमंत्री निर्णला सीतारमण यांनी स्पष्ट केलं. पश्चिम आशियातील तणाव असूनही भारत वेगाने प्रगती करत असून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले.
आता डॉलरची दादागिरी संपणार? रुपयाचा भाव वाढवण्यासाठी RBI ने कसली कंबर; काय आहे नेमका प्लॅन?
भारतीय जनता पक्षाच्या ‘विकसित भारत’ कार्यक्रमात अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा दावा केंद्र सरकार करत नाही, तर सकल राष्ट्रीय उत्पादनाची आकडेवारीच हे दर्शवते.त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) देखील भारताला प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था मानते.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सीतारामन म्हणाल्या की, काँग्रेसचे नेते देशाच्या आर्थिक कामगिरीवर सातत्याने टीका करत आहेत, तर दुसरीकडे भारत प्रत्येक तिमाहीत आणि प्रत्येक वर्षी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत सतत म्हणतात की मोठे आर्थिक संकट येणार आहे, पण भारतावर असे कोणतेही संकट येणार नाही.काँग्रेस नेत्याच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल नागरिकांमध्ये चुकीचा समज निर्माण होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या, “विरोधी पक्षनेते आणि त्यांचा पक्ष भारत संकटात आहे असा लोकांचा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न करतात. तरीही, पश्चिम आशियातील संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळे असूनही, भारताची प्रगती सुरूच आहे.” इंधन पुरवठा आणि जागतिक व्यापारावर भू-राजकीय तणावाच्या परिणामाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, ही आव्हाने केवळ कच्चे तेल आणि एलपीजीच्या किमतींमधील चढ-उतारापुरती मर्यादित नाहीत.
“या आव्हानांचा परिणाम केवळ कच्चे तेल आणि एलपीजीच्या किमतींवरच नाही, तर जागतिक जहाज वाहतुकीवरही होतो. जहाज वाहतूक कंपन्या संघर्षग्रस्त भागातून प्रवास करण्यास कचरतात. जहाजांवरील हल्ल्यांच्या धोक्यामुळे विम्याचे हप्ते वाढतात. जहाज रिकामे असो वा कच्च्या तेलाने भरलेले, विम्याचा खर्च लक्षणीयरीत्या वाढतो आणि अखेरीस, देशात पुरवठा पोहोचेल याची खात्री करण्यासाठी हा खर्च सोसावाच लागतो,” असंही त्यांनी स्पष्टे केलं.
या जागतिक आव्हानांना न जुमानता, नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू ठेवला असल्याचा खुलासा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला.






