(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US-Iran Peace Deal: संपूर्ण जग सध्या तणावामध्ये आहे. जर शांतता करार झाला तर सगळे सुटकेचा श्वास घेतली. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी आज एका ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी होऊ शकते. या करारामुळे, फेब्रुवारीच्या अखेरीपासून सुरू असलेल्या युद्धाच्या समाप्तीची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय आला असून संपूर्ण जगासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे ही समस्या सुटली तर त्याच्याशी संलग्न सगळ्या समस्यांची कोडी सुटतील.
दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, कराराचा मसुदा पूर्णपणे तयार आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, करार झाल्यानंतर लगेचच सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होर्मुझची सामुद्रधुनी सर्व आंतरराष्ट्रीय जहाजे आणि तेलवाहू जहाजांसाठी पुन्हा खुली केली जाईल. आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर करारानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खरोखरच पूर्णपणे पुन्हा खुली झाली, तर कोणत्या देशांना सर्वाधिक फायदा होईल?
चीन – होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याने चीनला सर्वाधिक फायदा होईल, कारण या जलमार्गातून जाणाऱ्या एकूण तेलापैकी ३७.७% तेल एकटा चीन आयात करतो. ही सामुद्रधुनी बंद असल्याने चीनमधील व्यवसाय आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे.
भारत – भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अंदाजे ५०% या मार्गाने आयात करतो. होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याने भारताचे तेल आयातीवरील बिल कमी होईल, मालवाहतुकीचा खर्च कमी होईल आणि देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत होईल.
दक्षिण कोरिया आणि जपान – दक्षिण कोरिया आपल्या एकूण तेलापैकी १२% आणि जपान १०.९% तेल या सागरी मार्गाने आयात करतो. होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्याने त्यांच्यासाठीही ऊर्जेचे संकट पूर्णपणे दूर होईल.
सौदी अरेबिया – होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या एकूण तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा वाटा सर्वाधिक, म्हणजेच ३७.२% आहे. ही सामुद्रधुनी उघडल्यामुळे सौदी अरेबियाला आशियाई देशांमधील आपल्या खरेदीदारांना कोणत्याही अडथळ्याशिवाय तेल पाठवणे शक्य होईल.
इराक आणि संयुक्त अरब अमिराती – एकूण तेल निर्यातीत इराकचा वाटा २२.८% आणि संयुक्त अरब अमिरातीचा १२.९% आहे. नाकेबंदी उठवल्यामुळे त्यांचा ठप्प झालेला व्यापारही पुन्हा सुरू होईल.
कतार – कतार हा LNG आणि हेलियमचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार आहे. जगातील २०% LPG कतारमधून याच मार्गाने येतो.
कुवेत – कुवेतची अर्थव्यवस्था पूर्णपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. जर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला, तर इराणवरील अमेरिकेचे निर्बंध उठवले जातील, ज्यामुळे इराणला आपल्या बंदरांमधून दररोज २० लाख बॅरलपेक्षा जास्त तेल अधिकृतपणे विकण्याची परवानगी मिळेल. यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
जर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आणि वायूचा पुरवठा पुन्हा सुरू झाला, तर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होईल. शिवाय, जहाजांचे विमा हप्तेही स्वस्त होतील, ज्यामुळे जगभरातील महागाई कमी होण्यास मदत होईल.






