लग्नवेड्या भामट्याचा पर्दाफाश! ४ नावे, २५ पेक्षा अधिक महिला आणि कोट्यवधींची फसवणूक (Photo Credit- X)
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे असून तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद गुप्ता या बनावट नावांचा वापर करत होता. वृत्तपत्रांतील विवाह जाहिराती तसेच मॅट्रिमोनी संकेतस्थळांवर खोटी प्रोफाइल तयार करून तो महिलांशी संपर्क साधत असे. त्यानंतर प्रेमसंबंध व विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे, दागिने आणि मालमत्ता लाटण्याचा त्याचा धंदाच बनला होता.
या प्रकरणाचा उलगडा मिरा रोड येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे झाला. तक्रारदार महिलेने मार्च २०१९ मध्ये वृत्तपत्रातील जाहिरात पाहून आपल्या मुलीच्या विवाहासाठी आरोपीशी संपर्क साधला होता. आरोपीने स्वतःची ओळख अजय अग्रवाल अशी करून दिली आणि पीडित मुलीसोबत विवाह केला. विवाहानंतर लखनऊ येथे फ्लॅट घेऊन देण्याचे तसेच दोन मजली घर बांधून देण्याचे आमिष दाखवत त्याने तक्रारदार कुटुंबाला मिरा रोड येथील राहता फ्लॅट विकण्यास भाग पाडले.
यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत टप्प्याटप्प्याने तब्बल ८२ लाख रुपये उकळले. फेब्रुवारी २०२२ मध्ये नातेवाईकांच्या लग्नाचे कारण सांगून त्याने पीडित महिलेला दिल्लीला नेले. दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तिचे ३३ तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे घेतले आणि तिला मुंबईच्या रेल्वेत बसवून स्वतः फरार झाला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करून संपर्क तोडला. या प्रकारात संबंधित कुटुंबाची एकूण ९७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील फसवणूक आणि विश्वासघाताच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ ने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी नाव बदलून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने २४ मे २०२६ रोजी ग्रेटर नोएडा येथे सापळा रचून आरोपीला अटक केली.
अटकेदरम्यान आरोपीकडून जयप्रकाश गुप्ता या नावाचे बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन, राधा गुप्ता या नावाचे एटीएम कार्ड तसेच फसवणुकीच्या पैशांतून खरेदी करण्यात आलेली सुमारे २० लाख रुपये किंमतीची बीएमडब्ल्यू एक्स-१ कार जप्त करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीने अजय संतोष सिंग या नावाने अमरावती येथील एका महिलेशी विवाह करून तिची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.
तसेच, आरोपीने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये अंदाजे २५ पेक्षा अधिक दिव्यांग, मतिमंद, घटस्फोटित आणि असहाय महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण फसवणूक रॅकेटमध्ये आरोपीचा २७ वर्षीय मुलगा अविरल उर्फ प्रखर अनुजकुमार त्रिवेदी याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो बनावट कागदपत्रे तयार करणे, महिलांशी संपर्क साधणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मदत करत असल्याचे तपासात समोर आले असून त्यालाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.
आरोपीने पहिले लग्न अस्तित्वात असताना ती माहिती लपवून दुसरे लग्न केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील गुन्ह्यात आणखी कलमांची भर घालण्यात आली असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याकडून आणखी अनेक फसवणुकीच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.






