फोटो सौजन्य - Social Media
Tumbadchi Manjula : तुंबाडची मंजुळा या रहस्य आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेल्या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून आधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. रहस्य, भीती, गुढता आणि त्यात मिसळलेली गावकऱ्यांची भन्नाट कॉमेडी यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक प्रेक्षक हा चित्रपट एक परिपूर्ण मनोरंजनाची मेजवानी ठरणार असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलरमध्ये उषा नाडकर्णी यांच्या आवाजातील निवेदनातून प्रेक्षकांना एका रहस्यमय गावात नेलं जातं. गावातील विचित्र व्यक्तिरेखा, त्यांच्यावर आलेलं अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या अतरंगी घटना यामुळे ट्रेलर अधिकच रंगतदार बनला आहे. भयपटाची पार्श्वभूमी असली तरी विनोदाचा जोरदार तडका या चित्रपटाला वेगळेपण देताना दिसतो.
चित्रपटात मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडीत आणि शार्दूल सराफ यांची दमदार उपस्थिती पाहायला मिळते. कलाकारांचा सहज अभिनय, भन्नाट संवाद आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे ट्रेलरमध्ये मनोरंजनाची जबरदस्त झलक दिसते. मात्र ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गूढ रूपात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचं पात्र नेमकं काय आहे आणि तिच्यामागचं रहस्य काय, याची उत्सुकता ट्रेलर पाहिल्यानंतर अधिकच वाढते.
दिग्दर्शक विविध कोरेगांवकर यांनी सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची संधी मिळणं ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक पात्र आणि प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच [Zee Studios] चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही हा चित्रपट प्रेक्षकांना रहस्य, विनोद आणि ताजेपणाचा अनोखा अनुभव देईल, असं सांगितलं.
रहस्य, विनोद आणि थरार यांचा भन्नाट संगम असलेला तुंबाडची मंजुळा हा चित्रपट ५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






