( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरली आहे त्याची पत्नी संजना हिच्या प्रेग्नन्सीबाबत रंगलेल्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजना गरोदर असल्याच्या चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं.
सूरज चव्हाण आणि संजना हे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकले. बारामती येथे त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी करत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. नुकतेच त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर संजनाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ती बेबी बंपसह दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. अनेक चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
नुकतीच जान्हवी आपल्या लेकासह जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गेली होती. यानंतर तिने थेट सूरजच्या गावाला भेट देत आपल्या लाडक्या भावाची भेट घेतली.या भेटीदरम्यान तिने सूरजच्या गावातील मंदिरात जाऊन देवीआईचे दर्शनही घेतले. या खास क्षणांचा व्हिडीओ जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या व्हिडीओमध्ये सूरज, त्याची पत्नी संजना आणि कुटुंबीयांसोबतचे अनेक क्षण पाहायला मिळतात. मात्र, नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते संजनाच्या दिसणाऱ्या बेबी बंपने. तसेच मंदिरात देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर जान्हवी संजनाला आधार देताना दिसत असल्याने चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर “संजना गरोदर आहे का?”, “सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत या जोडप्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
मात्र, याबाबत सूरज चव्हाण किंवा संजना यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा केवळ सोशल मीडियावरील अंदाज आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांपुरत्याच मर्यादित आहेत.
दरम्यान, जान्हवीने या व्हिडीओला “कोणी असो-नसो… मी कायम तुझ्या सोबत आहे… तुला जपणार आहे” असे भावनिक कॅप्शन दिले असून, तिच्या आणि सूरजमधील भाऊ-बहीणीच्या नात्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.






