मोठा अनर्थ टळला! दुबई-मुंबई इंडिगो फ्लाइटची राजकोटमध्ये इमर्जन्सी लँडिंग,सर्व प्रवासी सुरक्षित
मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन कॉल आल्यानंतर इंडिगोचे विमान IGO 1452 राजकोटला वळवण्यात आले. त्यानंतर विमान उतरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, क्रू सदस्यांच्या लक्षात आले की कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येत आहे आणि त्यांनी पायलटला याची माहिती दिली. त्यानंतर विमान राजकोटला वळवण्यात आले. याची माहिती राजकोट विमानतळाला देण्यात आली. हे इंडिगो विमान २७ जुलै रोजी दुपारी ३:२६ वाजता उतरले. विमान २७ जुलै रोजी सकाळी ११:१९ वाजता दुबईहून निघाले.
कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी राजकोट विमानतळाने अग्निशमन, वैद्यकीय आणि बचाव पथकांना सज्ज ठेवून संपूर्ण आपत्कालीन तयारी सुरू केली होती. क्रूकडून सूचना मिळताच, पायलटने विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल सुरू केले, ज्यानंतर जमिनीवरील बचाव पथके, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका धावपट्टीवर दाखल झाल्या. हवेत असताना ही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तेव्हा दुबई-मुंबई विमान गुजरातच्या हवाई क्षेत्रात होते. ते सर्वात जवळचे ठिकाण असलेल्या राजकोटला वळवण्यात आले. सुरक्षित लँडिंगनंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. लँडिंगनंतर, ग्राउंड इंजिनिअर्स आणि विमानचालन सुरक्षा निरीक्षक स्मोक अलार्मच्या कारणाची चौकशी करत आहेत. विमान विमानतळाच्या बे मध्ये थांबवण्यात आले आहे.






