अर्थसंकल्पाचे आकारमान 52 हजार 619 कोटींवर
मुंबई : सर्व श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते यंदा स्थायी समिती स्थगित असल्याने आणि प्रशासक कारभार पाहत असल्याने अर्थसंकल्पात नेमके काय दिले जाणार याची चर्चा सुरू होती आणि अखेर शनिवारी सकाळी हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिका आयुक्त यांना सादर केला. यावेळी मुंबईच्या विकासासाठी 27 हजार 247 कोटी 80 लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली. सर्वाधिक 3 हजार 545 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद कोस्टल रोडसाठी करण्यात आली आहे. संपूर्ण अर्थ संकल्पात 14 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा 2023-24 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार 4 फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान 7 हजार कोटीने वाढले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पचे आकारमान 45 हजार 949 कोटी 21 लाख रुपये इतके होते. 2023-24 आकारमान 52 हजार 619 कोटी 7 लाख रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे आकारमान वाढल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात बेस्ट ला वाचविण्यासाठी 800 कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच मुंबईकरांसाठी करवाढीची नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही.