
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
Maharashtra to National And International Breaking News:
Sunetra Pawar PK Meeting: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत वाद
प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि बिहारमधील नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर (PK) व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या भेटीदरम्यान प्रशांत किशोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आपल्याकडून काम हवे असल्यास प्रदेशाध्यक्षपदाबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागेल, अशी थेट अटच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
08 Aug 2026 05:58 PM (IST)
इराण अमेरिका युद्ध अजून सुरु असून , अमेरिकेला अपेक्षित असे काहीच निकाल या युद्धात घडले नाहीत . इराण कोणत्याही किमतीवर शरण यायला तयार नाही . तर दुसरीकडे आता ट्रम्प याना अमेरिकेतून प्रखर टीका सहन करायला लागत आहे . कारण अमेरिकेकडे युद्ध सामुग्री कमी होत चालल्या असल्याच्या चर्चा आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकेच्या अंतर्गत वर्तुळात होत आहेत . यामुळे ट्रम्प यांच्या बरोबर जगात अमेरिकेची नाचक्की होत असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे . पण याबाबतची पुष्टी अजून तरी अमेरिकेच्या सैन्याचे हेड्क्वाटर पेंटागंण मधून करण्यात आली नाही .
08 Aug 2026 05:45 PM (IST)
महाराष्ट्रातील तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे हजारो विधी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देऊन कॅप प्रक्रियेत सहभाग घेतला असताना काही विधी महाविद्यालयांच्या मान्यता प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालये आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यामधील अडचणींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने म्हटले आहे
08 Aug 2026 05:30 PM (IST)
केंद्र शासनाने १ ऑगस्टपासून किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीबंदी लागू असल्याने भाईंदर परिसरातील पारंपरिक आणि लहान मच्छीमारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. उत्तन, पाली आणि चौक परिसरातील मच्छीमारांना केंद्राची परवानगी मिळाली असली तरी राज्याच्या हद्दीतील बंदीमुळे किनाऱ्यालगतच्या समुद्रात मासेमारी करता येत नाही. त्यामुळे ‘मासेमारी सुरू करायची तरी कधी?’ असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे.
08 Aug 2026 05:15 PM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. साईच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. तो सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर आधारित होता, पण त्याआधी बरा होऊ शकला नाही.
08 Aug 2026 04:57 PM (IST)
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता Gen Z आणि तरुणाईच्या प्रश्नावरून राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये सरकारविरोधातील नाराजीचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भागवतांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केला. वाचा सविस्तर...
08 Aug 2026 04:47 PM (IST)
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि इंधन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी घटना घडली आहे. ओमानच्या सागरी किनाऱ्याजवळून प्रवास करणाऱ्या एका व्यापारी जहाजावर भीषण हल्ला झाला असून, या हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये अचानक प्रचंड आग लागली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. आगीच्या तीव्र ज्वाळा आणि धुराचे लोट पसरू लागल्याने संकटग्रस्त खलाशांनी तातडीने खुल्या रेडिओ चॅनेलचा (VHF Channel 16) वापर करून जवळच्या इतर जहाजांकडे आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांकडे जीव वाचवण्यासाठी आकांताने मदत मागितली.
08 Aug 2026 04:37 PM (IST)
रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भरती परीक्षांमध्ये कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरी इच्छुकांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)च्या झारखंड शाखेने शुक्रवारी रांचीमध्ये मुख्यमंत्री निवासाकडे मोर्चा काढला. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी विद्यापीठापासून या मोर्चाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री निवासाकडे जाणाऱ्या ABVP कार्यकर्त्यांच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा रांची पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर झोपून निषेध नोंदवला, तर काही कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनावर चढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
08 Aug 2026 04:27 PM (IST)
राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण भेटीची माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे आठ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रासमोर सध्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विकासाशी संबंधित अनेक प्रश्न आणि मतदारसंघातील विविध प्रलंबित मुद्दे खासदारांच्या माध्यमातून केंद्रासमोर मांडायचे आहेत. याच विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
08 Aug 2026 04:17 PM (IST)
भूक लागली की झटपट बनणारे प्रकार तर आलेत. पण मॅगीवरचं प्रेम काही अजूनही कमी झालेलं नाही. पण २०१५ मध्ये, २-मिनिटांच्या मॅगीवरून एक मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मॅगीकडची ओढ काही प्रमाणात कमी झाला. याच लोकप्रिय मॅगी संदर्भात ( Maggi Controversy ) नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय दिला आहे. नेमका काय आहे हा निर्णय आणि त्याचा काय परिणाम होणार? सगळं सविस्तर जाणून घेऊयात.
08 Aug 2026 04:07 PM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यापूर्वी भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. साईच्या उजव्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. तो सध्या बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याचा सहभाग तंदुरुस्तीवर आधारित होता, पण त्याआधी बरा होऊ शकला नाही.
08 Aug 2026 04:00 PM (IST)
आसाममधील पूरस्थिती गंभीर
मृतांचा आकडा 97 वर 15 जिल्ह्यांमधील 1.68 लाखांहून अधिक लोक अजूनही पुरामुळं बाधित
08 Aug 2026 03:55 PM (IST)
Hinjawadi Metro News: शहराची जीवन वाहिनी ठरू पाहणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गातील पहिल्या टप्प्याचा प्रवास आता अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. करून सुरक्षा तपासणी पूर्ण ‘सीएमआरएस’ (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) कडून प्रवाशी वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी मिळाल्यामुळे हिंजवडी मेट्रो प्रत्यक्षात रुळावर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. प्रशासनाकडून आता उद्घाटनाच्या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) च्या मुहूर्तावर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
08 Aug 2026 03:45 PM (IST)
मुंबई, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी, तसेच आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी सर्व विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध केली आहे. सर्व विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रांमार्फत जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्ज स्वीकारण्यासाठी नवीन संगणकीय प्रणाली व्यवस्था सुरू केली आहे. यापूर्वी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे, नोंदीतील दुरुस्ती, तसेच जन्म प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील अर्ज नागरिकांना संबंधित आरोग्य विभागाच्या कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष सादर करावे लागत होते.
08 Aug 2026 03:35 PM (IST)
TRAI recruitment 2026 apply online: भारतातील इंटरनेट, मोबाईल नेटवर्क, डीटीएच, लँडलाईन ते टीव्ही सेवांशी संबंधित नियम नियंत्रित करणारी संस्था म्हणजेच ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये एसोसिएट कन्सल्टंट पदांसाठी भरती निघाली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यासाठी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही.
08 Aug 2026 03:25 PM (IST)
सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये परप्रांतीयांनी खोट्या शेतकरी प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, आतापर्यंत सुमारे ७० प्रकरणांमध्ये अनियमितता आढळली आहे. शेती झोनमध्ये अनधिकृत पडॉटींग आणि तुकडेबंदी कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून, या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने ‘एसआयटी’ कार्यान्वित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
08 Aug 2026 03:15 PM (IST)
वर्धा, ब्युरो. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे अनेक व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर केल्या जात आहे. पुरवठा विभागाने अलीकडील काळात केलेल्या कारवाईत ४३ ठिकाणी धाडी टाकून एकूण ६७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले, पण सध्या ही धडक कारवाई मोहीम थंडबस्त्यात पडली आहे.
08 Aug 2026 03:05 PM (IST)
बाप आणि लेकीचं नातं खूप जवळच, जिव्हाळ्याचं असतं. प्रत्येक बाबांसाठी त्यांची मुलगी लक्ष्मीच असते जणू… मात्र उत्तर प्रदेशातील नोएा येथून अशी एक घटना समोर आली, ज्यामुले बाप आणि लेक या नात्यावरून विश्वासच उडून जाईल. नोएडाच्या फेज-१ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेजे कॉलनीमध्ये ८ वर्षांच्या मुलीसमोर तिच्या वडिलांनी नग्न होऊन गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
08 Aug 2026 02:59 PM (IST)
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 33 हजार 809 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 308 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये 76 हजार 350 शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. पात्र ठरलेल्या 33 हजार 809 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.
08 Aug 2026 02:52 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात काल, दि. ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने संबंधित बँकांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील या ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपये आहे.
08 Aug 2026 02:40 PM (IST)
जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण जंक्शन, खड्डे आणि महामार्गालगतची अतिक्रमणे यावर वेळबद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करावे, अपघातप्रवण जंक्शनची सुधारणा सहा महिन्यांत करावी, तसेच जिल्ह्यातील रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
08 Aug 2026 02:31 PM (IST)
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरील पाथरगाव जुना दगडी इंद्रायणी नदी पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुक बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. त्याअन्वये पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सुरु होताना कि.मी. ९४ येथून वळविण्यात आली आहेत.
08 Aug 2026 02:20 PM (IST)
सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सोमवारी सकाळी 11 वाजता पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे इतर खासदार राहणार उपस्थित. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य पतिस्थीच्या अनुषंगाने ही भेट होणार आहे.
08 Aug 2026 02:09 PM (IST)
आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंडगार्डन परिसरातील वाहतुकीत शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. मोर्चा शाहीर अमर शेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान काढण्यात येणार आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना प्राधान्याने मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
08 Aug 2026 02:00 PM (IST)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्ष, परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक (FCRA) च्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दुपारी, काँग्रेसने आपल्या सर्व लोकसभा खासदारांना १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा तीन ओळींचा व्हीप जारी केला. इतर विरोधी पक्षही लवकरच याच मार्गाचा अवलंब करतील अशी अपेक्षा आहे.
08 Aug 2026 01:55 PM (IST)
भारतातील प्रमुख तंत्रज्ञान संस्था ‘आयआयटी मद्रास’ आणि इंडोनेशियाचे उच्च शिक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. आता ही संस्था जागतिक पातळीवर आपली संशोधन आणि नावीन्यपूर्ण क्षमता आणखी मजबूत करणार आहे. या करारानुसार भारत आणि इंडोनेशिया एकत्र काम करून एक मजबूत संशोधन आणि नावीन्यपूर्ण इकोसिस्टम तयार करतील. याच्या माध्यमातून दोन्ही देशांचे विद्यापीठे, संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्स संयुक्त प्रकल्पांवर काम करू शकतील. तसेच, डीप टेक्नॉलॉजीला बाजारापर्यंत पोहोचवण्यावर आणि नवीन तंत्रज्ञानाला उद्योगांशी जोडण्यावर भर दिला जाईल.
08 Aug 2026 01:50 PM (IST)
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करायचो तेव्हा मला उपदेश द्यायचे पण आता इन्स्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे, अशा खोचक शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी निर्णायक वळणावर येऊन पोहचली आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
08 Aug 2026 01:45 PM (IST)
आजचा अभिनेता फक्त कॅमेऱ्यासमोर दिसत नाही, तर कॅमेऱ्याच्या मागेही आपली जागा निर्माण करत आहे. चित्रपटांमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा वापर अनेक कलाकार आता स्वत:चे ब्रँड, कंपन्या आणि स्टार्टअप्स उभे करण्यासाठी करत आहेत. फॅशनपासून स्पोर्ट्सपर्यंत आणि ब्युटीपासून तंत्रज्ञानापर्यंत त्यांची गुंतवणूक पाहायला मिळते.
08 Aug 2026 01:40 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या पगाराला विलंब झाला आहे. दर महिन्याला ७ तारखेला वेतन मिळण्याची अपेक्षा असताना यंदा १० ऑगस्टपर्यंत पगारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. सोमवारी, १० ऑगस्टला पगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी वेळेवर वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
08 Aug 2026 01:35 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (8 ऑगस्ट 2026) IIT Delhiच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी मिश्कील अंदाजात केलेल्या एका वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
08 Aug 2026 01:30 PM (IST)
आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तसेच शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हेदेखील यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना जीवनाशी संबंधित महत्त्वाचे धडे दिले. त्यांनी विविध क्षेत्रांवर चर्चा करण्यासोबतच ‘एआय’चे महत्त्वही अधोरेखित केले.
08 Aug 2026 01:25 PM (IST)
जुलै २०२६ च्या कार विक्री अहवालातील आपल्या प्रभावी कामगिरीमुळे मारुती सुझुकीने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे. कंपनीच्या सहा लोकप्रिय मॉडेल्सनी सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारच्या यादीत स्थान मिळवले आहे. गेल्या महिन्यात, मारुती सुझुकी डिझायरने २३,७९१ युनिट्सच्या दमदार विक्रीसह देशातील पहिल्या क्रमांकाच्या कारचा किताब पटकावला, ज्यात वार्षिक १४% ची भरीव वाढ नोंदवली गेली.
08 Aug 2026 01:15 PM (IST)
जागतिक स्तरावर अंदाधुंद माजली असताना कच्च्या तेलाचा प्रश्न उपस्थित झाला. जागतिक बाजारात मोठा ताण निर्णाम झाला. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती चांगल्याच कडाडल्या. आयात धांबली असल्यामुळे पेट्रोल मिळतंय की नाही हा प्रश्न उपस्थित राहिला होता. या सगळ्यावर उपाय म्हणून आणि संपूर्णपणे जागतिक स्तरावर अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने इथेनॉलचा ( E20 Petrol ) वापर सुरु केला. त्याचा वाद बराच वाढला.
08 Aug 2026 01:07 PM (IST)
पश्चिम आशियातील भू-राजकारणात पुन्हा एकदा मोठी हलकल्लोळ उडाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांच्या प्रकृतीबाबत इस्रायली आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये खळबळजनक दावे केले जात आहेत. इस्रायलच्या एका प्रमुख दूरचित्रवाणी वाहिनीने आणि वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तामुळे इराणच्या सर्वोच्च राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात खळबळ उडाली असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या प्रकृतीविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
08 Aug 2026 01:02 PM (IST)
पारनेर तालुक्यातील कडूस गावच्या परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वाडेगव्हाण, सुपा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चार ते पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उषा पांडुरंग शिंदे (वय ४२ वर्ष) राहणार कडूस गावच्या रहिवासी होत्या. त्यांना दररोज सकाळी गावच्या डोंगर परिसरात फिरण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे ते सकाळी घरातून फिरण्यासाठी बाहेर पडल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास परिसरात गुरे चालत असलेले नामदेव करंजुले यांना कडूस ते पाडळी रांजणगाव मार्गावरील दमान माथा या नावाच्या टेकडीच्या पायथ्याजवळील शेतात उषा शिंदे या रक्ताच्या चारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
08 Aug 2026 12:48 PM (IST)
राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची (FRP) चुकीची आकडेवारी साखर आयुक्त कार्यालयाला सादर केली असून, अशा कारखान्यांवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. थकीत ऊसबिलासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयात राज्याचे साखर आयुक्त डॅा. संजय कोलते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत राजू शेट्टी यांनी साखर उद्योगातील गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांच्या लुटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. उसाचे वजन आणि रिकव्हरी (उतारा) यामध्ये होणारी चोरी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सर्व वजनकाटे तातडीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन जोडले जावेत, जेणेकरून काटामारीला आळा बसेल. यासोबतच, मराठवाड्यातील कारखान्यांमध्ये रिकव्हरी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, ते रोखण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने तिथे स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारावी, अशीही मागणी शेट्टींनी केली.
08 Aug 2026 12:36 PM (IST)
पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्र बबनराव खेडेकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ‘या आरोपांवरून नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा उघडकीस येत असून, पुणे महापालिकेत नोकरीचे खोटे आश्वासन देऊन बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम लाटली आहे. हा गुन्हा मोठ्या संघटित कटाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे; तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे. आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता त्याला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही,’ असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. के. शर्मा आणि एस. आर. पवार यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात हे आदेश दिले.
08 Aug 2026 12:24 PM (IST)
सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने हवाई दलातील मृत जवानाचे बनावट ओळखपत्र दाखवून हवाई दलाचा गणवेश शिवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शुभम विलास अंबुरे (वय २६, रा. शिक्रापूर रस्ता, ता. शिरूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत हवाई दलातील जवान ब्रिजेशकुमार मिश्रा (वय ४८) यांनी लोहगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ६ जुलै रोजी लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीजवळील एका टेलरच्या दुकानात उघडकीस आली आहे.
08 Aug 2026 12:12 PM (IST)
कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पाण्यात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अत्याचाराचा देखील व्हिडीओ काढून तो समाज माध्यांवर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडितेला तरुणाचा भाऊ आणि वडिलांनी देखील मारहाण करत धमकी दिली. ही घटना १ एप्रिल ते १५ जुलै २०२६ दरम्यान एका हेअर ट्रान्सप्लांट सेंटर व फुलंब्रीतील एका हॉटेलवर घडली आहे. सरफराज मेहबूब गोनगावे, त्याचा भाऊ अरबाज गोनगावे, वडिल मेहबूब गोनगावे (सर्व रा. गल्ली क्रं.७, रहिमनगर, आजाद चौक) अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
08 Aug 2026 11:59 AM (IST)
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तृशांत भाटकर व युवकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा धक्कादायक शुक्रवारी मध्यरात्री उशिराच्या सुमारास हा सगळा धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. आंजर्ले आडेफाटा येथे गुरे बेशुद्ध अवस्थेत मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे या गुरांना बेशुद्ध करण्यासाठी पावदृश्य कोणता तरी पदार्थ खायला घातल्याचा आरोप अक्षय फाटक व पप्पू रेळेकर यांनी केला आहे हे गुरु पकडल्यानंतर दोन गाड्या दापोलीच्या दिशेने जीवघेण्या वेगाने गेल्या.
08 Aug 2026 11:43 AM (IST)
चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास सोनपत्राच्या वरील बाजूस एका मोठ्या वळणावर टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास घाटातून प्रवास करणारा टँकर मोठ्या वळणावर अचानक पलटी झाला. अपघातानंतर टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे चिपळूण तसेच कराडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असून त्यानंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुंभार्ली घाट हा वळणावळणाचा आणि धोकादायक मार्ग असल्याने वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, टँकर हटवल्यानंतरच घाटातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
08 Aug 2026 11:37 AM (IST)
लोटे एमआयडीसीमध्ये कोका-कोला कंपनी आणण्यासाठी शिवसेना-भाजप सरकारने मोठे प्रयत्न केले होते. मात्र आता या कंपनीतील स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर चर्चा करताना भाजपला विश्वासात घेतले जात नसल्याचा गंभीर आरोप भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला. यामुळे सत्ताधारी आघाडीतील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला असून सरकार या विषयात पूर्णपणे पोल ठरल्याची टीकाही त्यांनी केली.
खेडेकर म्हणाले, "स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी भाजपने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र आता रोजगाराच्या निर्णयप्रक्रियेत भाजपला डावलले जात आहे. हा स्थानिक जनतेच्या विश्वासघाताचा प्रकार आहे."
08 Aug 2026 11:26 AM (IST)
विधानमंडळ समितीचे अध्यक्ष तथा आमदार अर्जुन खोतकर हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर अहिल्यानगरमध्ये आले आहेत. आज त्यांनी शहरातील विशाल गणपती मंदिराला भेट देत दर्शन घेतले. त्यानंतर स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयालाही भेट दिली.
यावेळी अर्जुन खोतकर यांनी अनिल राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. नगर जिल्ह्यातील पहिले हिंदुत्ववादी आमदार म्हणून अनिल राठोड यांची आजही जनतेच्या मनात प्रतिमा कायम असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणात चढ-उतार होत असतात, मात्र अनिल राठोड यांचे हिंदुत्वाचे विचार आजही जिवंत असल्याचे खोतकर म्हणाले.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात शिवसेनेचाच आमदार असेल, असा विश्वासही अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.
08 Aug 2026 11:13 AM (IST)
कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या खाड्याच्या पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन ॲनिमेटेड व्हिडीओ बनवले आहे.ग्रामीण खाड्याचा पाडा शाळेत अवतरली असून विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बनवले स्वतःचे ॲनिमेटेड व्हिडिओचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचापाडा शाळेने केले आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक संतोष नाटिकर यांचे मार्गदर्शन घेऊन"आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे ॲनिमेटेड व्हिडिओ निर्मिती" केली आहे. या विषयावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते.या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेत इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक संतोष देवेंद्र नाटीकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एआय चा वापर करून केवळ काही मिनिटांत आकर्षक शैक्षणिक ॲनिमेटेड व्हिडिओ कसे तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
08 Aug 2026 11:07 AM (IST)
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा सोशल मीडिया रिल्स आणि व्हिडीओ तयार करण्यासाठी वापर केला जात असल्याने इतिहासप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याऐवजी तेथे मनोरंजनाच्या उद्देशाने चित्रीकरण केले जात असल्याने किल्ल्याचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व धोक्यात येत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.
08 Aug 2026 10:56 AM (IST)
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी‘ मालिकेत भक्तांना चातुर्मास पर्व पाहायला मिळत आहे. उषा नावाच्या एका निस्सीम भक्ताने अत्यंत श्रद्धेने हाती घेतलेले ‘सोळा सोमवार’ व्रत खंडित करण्यासाठी असुरी शक्तींकडून मोठे षड्यंत्र रचले जात असताना, स्वतः आई तुळजाभवानी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कालचक्र फिरवणार आहे. पहा, ‘आई तुळजाभवानी’- ‘चातुर्मास पर्व’ सध्या कलर्स मराठीवर सुरू आहे आणि प्रेक्षकांना याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.
08 Aug 2026 10:46 AM (IST)
राज्य पोलिस दलातील सुमारे 23 हजार रिक्त पदांपैकी 15 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या दलात पोलिस उपनिरीक्षकांची (फौजदार) पदे रिक्त आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखतानाच कार्यरत पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी फौजदारांची पदभरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी गुरुवारी दिली.
08 Aug 2026 10:36 AM (IST)
Gemini Omni Free Access: टेक कंपनी गूगलने त्यांच्या जेमिनी ओम्नीच्या मोफत ॲक्सेसचा कालावधी आणखी काही काळासाठी वाढवला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्सना गूगल एआय सब्सक्रिप्शनचे पैसे खर्च केल्याशिवाय नवीन एआय व्हिडीओ टूल वापरण्याची संधी मिळणार आहे. कंपनी प्रत्येक यूजरला 10 मोफत व्हिडीओ क्रिएट करण्याची संधी देणार आहे.
08 Aug 2026 10:26 AM (IST)
युरोपमध्ये बड्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागपूरच्या 28 वर्षीय विवाहितेला पोर्तुगालमध्ये पाठवून मानवी तस्करीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसंगावधान राखत तिने स्वतःची सुटका करून भारत गाठल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तिच्या तक्रारीवरून पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात कंपनीसह आठ जणांविरुद्ध फसवणूक, मानवी शोषण, गुन्हेगारी कट आणि धमकीसह विविध न कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
08 Aug 2026 10:16 AM (IST)
वळण येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत राहत्या घरात गळफास घेतला. याप्रकरणी पत्नीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक ज्ञानेश्वर दत्तात्रय भाकरे हे पत्नी धनश्री व मुलीसह वळण येथे वास्तव्यास होते.
08 Aug 2026 10:06 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक अनेक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहे. त्यातच सणासुदीच्या तोंडावरच किराणा आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये अचानक वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. रोजच्या जेवणाचा खर्च वाढला असून, येत्या सणासुदीत मिठाईही महाग होण्याची चिन्हे आहेत.