संभाजीनगरात अवघ्या ७ तासांत 'राँग साईड' चालकांकडून लाखांचा दंड वसूल (Photo Credit- X)
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार वाहतूक विभागाने सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशेष मोहीम राबविली. मोंढा नाका, सिटी चौक, सेव्हन हिल, आकाशवाणी चौक, एपीआय कॉर्नर, हायकोर्ट सिग्नल, सेशन कोर्ट सिग्नल, मिलिंद चौक, नगर नाका, महावीर चौक, ओअॅसिस चौक आणि वाळूज गाव परिसरात तपासणी करण्यात आली. या काळात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलिसांच्या मते, राँग साईडने वाहन चालविणे हे शहरातील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच गंभीर अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे अशा चालकांविरोधात नियमितपणे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
देवळाई चौकात वाहतूक नियमनादरम्यान एका लाल रंगाच्या कारवरील नंबरप्लेट संशयास्पद आढळली. तपासणी केली असता वाहनावर लावलेला क्रमांक बनावट असल्याचे उघड झाले. मूळ क्रमांक बदलून फॅन्सी नंबरप्लेट लावल्याची कबुली चालकाने दिली. ई-चलानपासून बचाव करण्यासाठी हा प्रकार केल्याचेही समोर आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. राँग साईडने वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, सिग्नल तोडणे आदी प्रकारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.






