मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत महाराष्ट्रातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात कमाल तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. संभाजीनगर शहर व जिल्ह्यात दोन ते तीन वेळा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता.
दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे कि, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच नागरीकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






