मुंबई– शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबात केलेलं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांना भोवण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. तर राज्य महिला आयोगाकडंही याबाबत अंधारे यांनी तक्रार केली आहे. तर चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं शिरसाट म्हणालेत. त्यामुळं हा वाद पेटण्याची शक्यता असून, शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य वाढत असून, नवीन एका वादाला तोंड फुटले आहे.
अंबादास दानवे आक्रमक…
दरम्यान, अंबादास दानवे म्हणाले की, आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत केलेले वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि क्रिमिनल लॉमध्ये बसणारे आहे. याविरोधात आपण छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार करू. असं दानवेंनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले शिरसाट?
आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत म्हणते. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.’ असं शिरसाट यांनी म्हटल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले असून, विरोधकांनी शिरसाट यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.