मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी राज्य सरकारकडून मान्य
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील एका मागणीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या वारसदारांना एकूण ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. आठ जिल्ह्यांमधील ३४ मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान एकूण ३०९ आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मृत आंदोलकांच्या वारसदारांसाठी २७ कोटी ५० लाख रुपये मदतीसाठी मंजूर कण्र्यात आले होते. यापैकी ३४ व्यक्तीच्या कुटुंबाना मदत मिळणे अद्याप बाकी होते. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ‘मृत आंदोलकांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज्य सरकारकडून हि मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून उर्वरित वारसदारांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आज तातडीने आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारकडून विविध जिल्हयांतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या एकूण ३४ मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांची मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यातील एकूण १५ आंदोलक, धाराशिवमधील ५, परभणी जिल्ह्यातील ४, नांदेडमधील ३ आणि जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूरमधील प्रत्येकी १ अश्या आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कायदेशीर वारसांना आर्थिक मदत मिळणार आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जरंगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता तातडीने करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
MLC Election : महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर; काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा






