मुंबई- नवी दिल्लीत (Delhi) भाजपाची (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संपन्न झाली. यावेळी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली तसेच देशातील आगामी नऊ राज्यातील विधानसभा निवडणुका यावर देखील रणनीती ठरवण्यात आली. दरम्यान, या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले भाषण, कार्यकारिणीत मांडलेले दोन ठराव यांची जोरदार चर्चा सुरु आहे.
[read_also content=”मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबईत भाजपा-शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शन, ठाकरेंच्या अंगणात पोस्टरबाजी; उदया मुंबई महापालिकेच्या प्रचाराचं बिगुल वाजणार? https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-occasion-of-modi-visit-the-bjp-shinde-faction-in-mumbai-showed-power-displayed-posters-in-thackeray-yard-will-sound-the-trumpet-of-the-campaign-of-mumbai-municipal-corporation-362566.html”]
फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय?
देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दोन ठराव मांडले. तसेच पंतप्रधानांच्या भाषणातले मुद्दे सांगण्यासाठी पक्षाने त्यांना पत्रकार परिषद घेण्याची संधी दिली. भाजपकडे नेत्यांची आणि प्रवक्ते यांची मोठी फळी असतानाही फडणवीस हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ठळक नजरेत आले, उठून दिसले. यामुळं देवेंद्र फडणवीसांचं भाजपातलं महत्त्व वाढतंय का? परिणामी लवकरच देशपातळीवर किंवा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
ठराव आणि फडणवीस काय म्हणाले?
‘बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ’च्या धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवले पाहिजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले, की पंतप्रधांनांनी सांगितले आहे, सीमेलगतची गावे आणि जिल्ह्यांत पक्षाने एक असा उपक्रम राबवला पाहिजे, ज्यामुळे तेथे विकास होईल आणि लोकांचे जीवनमान उंचावेल. ज्याप्रमाणे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवण्यात आले त्याच धर्तीवर ‘धरती बचाओ’ अभियान राबवायला हवे. नैसर्गिक शेती असो की मग सौरऊर्जा किंवा अन्य एखादा उपक्रम. आज पृथ्वीला वाचवण्याची गरज आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक संकल्प हे दोन ठराव कार्यकारिणीत फडणवीसांनी मांडले आणि ते पारित झाले.
दूरदृष्टीने काम करा- पंतप्रधान
दरम्यान, पंतप्रधानांनी भाजपसाठी पुढील २५ वर्षांचे व्हिजनही मांडले. यात पक्षाला फक्त राजकीय न ठेवता सामाजिक उपक्रमाच्या रूपात बदलण्याचे आवाहन करण्यात आले. एक पक्ष म्हणून भाजपने जो पल्ला गाठला आहे, त्याची व्याप्ती वाढवून सामाजिक कामे करण्यापर्यंत न्यायचे आहे. मोदी म्हणाले, की नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बूथ मजबूत करा १८ तेे २५ वयाच्या तरुणामध्ये सुशासन काय असते, हे स्पष्ट करा. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पक्षाने एक महत्वाचा निर्णय घेेत अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढवला आहे.