Maharashtra Asselbly Election 2024 - Mahayuti
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावटपावरून चढाओढ सुरू असल्याच्या चर्चा होत्या. यात शिंदे गटाने १०० तर अजित पवार यांच्या गटाने ९० जागांवर दावा केला होता. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाने जागावाटपांबाबत केलेल्या मागण्यांमुळे महायुतीतीत धुसफूस सुरू होती. पण या भाजप किती जागांवर लढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.
पण काही सुत्रांच्या हवाल्याने, महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न सुटल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 155 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. तर भाजपकडून शिंदेसेनेला 60 ते 65 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रामदास आठवले यांनी त्यांच्या रिंपाईसाठी 10 जागांची मागणी केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विधानसभेसाठी जवळपास 20 जागा मिळू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष जागावाटपाच्यावेळी रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, 2019 च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 पैकी अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला. तर सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही विजय मिळवत काँग्रेसला पाठिंबा दिला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. पण यंदा मात्र भाजपला 9 उमेदवार विजयी झाले. लोकसभेच्या या निकालानंतर आता भाजपने विधासभा निवडणुकीसाठी भाजप सावध पावले टाकताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत विजयानंतर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चाही झाली होती.
दरम्यानस काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 100 ते 105 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर ठाकरे गटाला 90 ते 95 जागा आणि शरद पवार यांचा गट 80 ते 85 जागांवर लढू शकतो, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. महाविकास आघाडीने आता तीनही गटांना प्रत्येकी 96-96-96 जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे.