नवी दिल्ली- “माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…” असं राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद होत आहे. सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. यावरुन बरेच राजकारण रंगले आहे. याआधी देखील राहुल गांधींनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली होती, त्यानंतर मोठा वाद तसेच भाजपाकडून आंदोलनं करण्यात आली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मविआतील सहकारी पक्ष देखील नाराज आहेत. काल नवी दिल्लीत विरोधीपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिला आहे. तर दिल्लीत शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत. दरम्यान, सावरकरांविषयी राहुल गांधी वाद ओढावून घेताहेत का? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
भारत जोडो यात्रेत देखील वाद
काँग्रेस नेते राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण ही यात्रा सुरुवातीला या यात्रेची दखल म्हणावी तशी घेण्यात आली नव्हती. पण ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आणि माध्यमांनी सर्व लक्ष राहुल गांधी व भारत जोडो यात्रेवर केंद्रीत केलं. ज्या यात्रेला मीडियाने कव्हरेज दिले नव्हते, पण राहुल गांधींच्या सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर मात्र राहुल गांधी व यात्रा चर्चेत राहिली. तो वाद शांत होतो न होतो, तोच पुन्हा एकदा राहुल गांधींना सावरकारांबाबत वाद ओढावून घेतला आहे.
“माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…”
दरम्यान, राहुल गांधींना दोन मोठे झटके बसले आहेत, सुरुवातीला मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळं सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची सुनावली आहे, तर लोकसभेतील त्यांचे खासदारकी रद्द करण्यात आलेली आहे. यावेळी लोकांकडून राहुल गांधींना सहानुभूती मिळत होती, पण अचानक त्यांनी माफी मागायला माझे नाव सावरकर नाही. असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा वाद पेटला असून, भाजपाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे, त्यामुळं हा मुद्धा भाजपान चांगलाच रंगवला असून, याचा गैरफायदा व फायदा भाजपा घेत आहे. राहुल गांधींचे हे वक्तव्य म्हणजे पॉलिटेकली इनकरेक्ट आहे, असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचा नाराजीचा सूर?
सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये विरोधीपक्षाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक महत्वाची वक्तव्यं केली आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हटल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांच्या मुद्द्यावरुन माफी मागणार का? असं प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चर्चेतून मार्ग निघेल – ठाकरे गट
काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
थोबाडीत मारणार का? – मुख्यमंत्री
मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तुम्ही फक्त सल्ला दिला, तुमची भूमिका स्पष्ट का केली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गट, भाजपावर टिका केली आहे.