Sanjay Raut PC: 'स्वाभिमान जागा झाला असेल तर मातोश्रीवर या'; अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर संजय राऊतांचे खुले आव्हान
Sanjay Raut PC: “ज्यांचा स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी,” असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. शिवसेना एकच आहे, दोन शिवसेना असूच शकत नाहीत. जिथे ठाकरे आहेत. तिथे शिवसेना आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली, त्याच शिवसेनेचे नेतृत्त्व आज उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला लोक शिवसेना म्हणत आहेत ती गृहमंत्री अमित शाहांची शिवसेना आहे. अशा जहरी शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
खरंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एका विधानामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये काहीही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात बोलतेना सत्तार म्हणाले होते की, मित्रपक्ष शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करत आहे. पण आमचा त्याग कामाख्याला माहिती आहे. भाजप तो विसरली आहे. पण आमची ममता होणार नाही, याची काळजी घेतली आहे. शिवसेनेचे दोन भाग केले, पण मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत”
सत्तार यांच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. ” तुम्ही आणि तुमचे नेते भाजपसोबत गेले. पण आज तुमचेनेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहेत. तुम्ही ही भूमिका का स्वीकारली , त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा. भाजप बरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी, महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासारखं आहे. अब्दुल सत्तारांनी त्यांच्या नेतृत्त्वाला सांगायला पाहिजे. त्यावर जाहीर भूमिका व्यक्त करावी, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले होते सत्तार?
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटातील संबंध चांगलेच ताणले गेल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच अब्दुल सत्ता यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांच्या मनातील रोष व्यक केला होता. “भाजप शिवसेनेचं मुंडक उडवण्याचं काम करत आहे. आमची जिल्हापरिषद गेली, महापालिकेत आमची सत्ता होती. तीही गेली. आधी त्यांचे हातपाय तोडले आता आमचं मुंडक तोडायचं काम सुरू आहे. माझा विरोध नाही. पण परिस्थिती पाहता शिवसेसेनत दोन भाग करायचे, एकाला हाताशी धरायचं, एकावर अन्याय करायचा. दुसऱ्याला हाताशी धरायचं आणि तिसऱ्यावर अन्याय करायचा, अशा पद्धतीने एक मोठा भाऊच आपल्या लहान भावाला संपवत असेल तर त्याला इलाज नाही. पण राज्याच्या मुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.
संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, ( अब्दुल सत्तार) भाजप हे स्लो पॉईजन असल्याचे ते म्हणत होते, असं मला कोणतीरी सांगितले, आता कळेल त्यांना पॉईजन काय असते ते. जर कोणाला पश्चाताप झाला असेल, ज्या पद्धतीने भाजप त्यांचे अपमान करत आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे परत यायला पाहिजे. मुळात शिंदेंसोबत असलेले लोक तो पक्ष नाहीच, निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरते पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. पण घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळणार आहे. पण ज्यांना खरंच पश्चाताप झाला असेल त्यांनी उद्धव ठाकरेकडे परत यावं, पण काही लोकांनी निश्चितच प्रवेश मिळणार नाही.






