ICC ODI Ranking : आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, आता ICC रँकिंगमध्येही डंका; पहिल्या पाचमध्ये 'या' भारतीय खेळाडूंचा समावेश.. (फोटो-सोशल मीडिया)
ICC ODI Ranking : भारताने 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद आपल्या नावे केले आहे. न्यूझीलंडचा पराभव करत भारताने विजेतेपदावर आपले नाव कोरले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला आहे. अशातच आता आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारी देखील भारतीय खेळाडूंचा डंका बघायला मिळत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व गोष्टीचा त्याला आयसीसी वनडे क्रमवारीत फायदा झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केलेली दमदार कामगिरीनंतर स्टार सलामीवीर शुभमन गिल एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच स्टार फलंदाज विराट कोहली स्पर्धेत 218 धावा केल्या आहेत. त्या जोरावार किंग कोहलीही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचला आहे. कोहली एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.
हेही वाचा : Shahid Afridi: ‘पाकिस्तान क्रिकेट ‘ICU’त…’ ; शाहिद आफ्रिदीने आपल्याच क्रिकेट बोर्डाला दिला घरचा आहेर..
या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल सहाव्या स्थानावर पोहचला आहे. रचिन रवींद्र 14 स्थानांचा फायदा होऊन त्याने 14 वे स्थान पटकावले आहे. तसेच ग्लेन फिलिप्स सहा स्थानांनी वर येत 24व्या स्थानावर पोहचला आहे.
Champions Trophy finalists receive big boost in the latest ICC Men’s Player Rankings 👊
Read more ⬇️https://t.co/YM26ak85wm
— ICC (@ICC) March 12, 2025
न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरला गोलंदाजीच्या वनडे क्रमवारीत चांगलाच फायदा झाला असून तो आता वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सँटनरने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान 9 विकेट्स आणि अंतिम सामन्यात दोन विकेट घेतल्या, ज्यामुळे हा डावखुरा फिरकीपटू एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत सहा स्थानांची झेप घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश थेक्षाना क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने चौथ्या क्रमांक पटकावला आहे. तसेच नामिबियाचा बर्नार्ड शॉल्ट्ज वनडे गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावे केली. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे. तर न्यूझीलंडला उपविजेतपदावर समाधान मानावे लागले.