महिला क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतींमध्ये भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. २००९ पासून दोन्ही संघांमध्ये एकूण १६ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानला १३ वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तानला केवळ ३ वेळा यश मिळाले आहे.
भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघ एड्जबॅस्टनवर फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ८ विकेट्सने पराभूत केले होते. त्याव्यतिरिक्त, या मैदानावर भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारतीय संघाने एडजबॅस्टनवर सर्व संघांविरुद्ध सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानने तिथे खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत.
बर्मिंगहॅममधील एड्जबॅस्टन हे फलंदाजांसाठी अनुकूल मैदान मानले जाते. येथे महिला टी-20 सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला आहे. या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या सुमारे १४५ तर दुसऱ्या डावाची सरासरी १२६ धावा आहे. तसेच येथे २२१ धावांचा सर्वोच्च स्कोअर नोंदवला गेला आहे.
भारतीय आणि पाकिस्तानी महिला संघांमधील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल.
जर तुम्हाला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी-२० विश्वचषक सामना टीव्हीवर पाहायचा असेल, तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवर पाहू शकता. तसेच, भारत-पाकिस्तान सामन्यासह महिला टी-२० विश्वचषकातील प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टारवर असेल, जे तुम्ही त्यांच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर पाहू शकता.






