(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मोठी बातमी ! EPFO ने जुना नियम बदलला; आता 25 हजारापर्यंतच्या मूळ वेतनावर मिळणार पेन्शन?
राज्य शासनाच्या शहर सौंदर्याकरण उपक्रमांतर्गत वसई-विरार व महापालिकेच्या निधीतून शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी ६० शिल्पे, कारंजी आणि सौंदर्यस्थळे उभारण्यात आली होती. मात्र, नियमित देखभाल आणि निगा न राखल्याने अनेक ठिकाणी शिल्पांच्या परिसरात गवत आणि काटेरी झुडपे वाढली आहेत.
काही शिल्पांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी महापालिकेच्या निधीतून उभारलेल्या शिल्पांवर खासगी व्यक्ती, राजकीय पक्षांचे बॅनर लावले जात आहेत. परिणामी सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या प्रकल्पांच्या देखभालीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारंज्यांमध्ये पाणी नसून ती अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. रात्री शहराची शोभा वाढवण्यासाठी बसवण्यात आलेली फ्लड लाईट आणि अन्य प्रकाशयंत्रणाही अनेक ठिकाणी बंद पडल्याने सौदर्यस्थळे अंधारात हरवली आहेत. शिल्पांच्या देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी कचरा साचला असून, कारंजी बंद पडली आहेत, तर प्रकाशयोजनाही नादुरुस्त झाल्याची बाब लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. महासभेत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी ‘फ्लड लाईट ‘व्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक ठिकाणी दिवे बंद असतानाही देखभालीसाठी मोठा निधी खर्च केला जात असल्याचा आरोप केला. स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सौंदर्यस्थळांवर कचरा साचणे, दिवे बंद राहणे किंवा कारंजी नादुरुस्त असणे यासाठी प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधींनी तक्रार करण्याची वेळ येता कामा नये. प्रशासनाने स्वतःहून नियमित पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करणे अपेक्षित आहे, असेही सुनावले.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर महापालिकेने २०२६-२७ते २०२८-२९ या तीन वर्षांसाठी शिल्पे, कारंजी आणि सौदर्यस्थळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यापूर्वीच्या देखभालीत झालेल्या हलगर्जीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, नवीन निधी खर्च करण्यापूर्वी विद्यमान सौंदर्यस्थळे पूर्ववत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी त्याच्याच देखभाल-दुरुस्तीसाठी पुन्हा खर्च करण्याच्या प्रस्तावावर महासभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली..
शहरातील अनेक सौदर्यस्थळे आज ओसाड आणि दुर्लक्षित दिसत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कशासाठी झाला, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहराचे सौंदर्य वाढवण्याच्या उद्देशाने उभारलेली शिल्पेच आज दुर्लक्षामुळे विद्रूप झाल्याने त्यांची नियमित देखभाल आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली जात आहे.






