गुटखाबंदी असतानाही लोटे परिसरात लाखोंचा गुटखा साठा? खेडमध्ये कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी परिसरातील एका गोदामामध्ये लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवण्यात आला असून, रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून त्याचे विविध भागांत वितरण केले जात असल्याचे कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा आणि वितरण सुरू असल्याच्या आरोपांमुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नुकतेच गुटखा माफियांविरोधात कठोर भूमिका घेत मोकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसरात गुटखा तस्करीचे कथित रॅकेट उघड झाल्याचा दावा समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी संबंधित गुटखा माफियांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, या कथित स्टिंग ऑपरेशननंतर अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा या आरोपांची कितपत गंभीर दखल घेतात आणि पुढे कोणती कारवाई करतात, याकडे आता खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गुटखाबंदी असतानाही सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व्यवहारांबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार, याबाबत नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.






