पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटणार? कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड; सुरज ठोंबरे टोळीची उडी (संग्रहित फोटो)
पुणे : कुख्यात आंदेकर तसेच गायकवाड टोळी संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून, संघर्षात आता सुरज ठोंबरे टोळीने उडी घेतल्याचे दिसत आहे. मकोकाच्या गुन्ह्यात तपासासाठी कृष्णा आंदेकर तसेच भाचे स्वराज व तुषार वाडेकर यांना न्यायालयातून कारागृहात नेत असताना या तिघांचा ठोंबरे टोळीकडून पाठलाग करून त्यांच्या खूनाचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सतर्कतेमुळे हा कट उघड झाला असला तरी पोलिस संरक्षणात असताना कृष्णा आंदेकरचा गेम वाजवण्याचा मोठा कट रचला गेल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणात पोलिसांनी दोघांना वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी) तसेच अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, सुरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले तसेच धिरज लखारा यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. याबाबत पोलिसांतर्फे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, आंदेकर व गायकवाड टोळीचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर आंदेकर टोळीकडून पहिला खून आयुष कोमकर याचा आणि नंतर गणेश काळेचा झाला. नुकतेच सहकारनगर ठाण्याच्या हद्दीत अक्षय म्हस्केवर खूनाचा प्रयत्न झाला. अक्षय म्हस्के थोडक्यात बचावला गेला. मात्र, आंदेकर टोळीकडून कारागृहात राहून देखील बदला घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे हादरलं ! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न; पोलीस चौकीजवळच…
पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, नातू स्वराज, तुषार वाडेकर यांच्यासह बहुतांश जणांना जेरबंद केले असून, ते सध्या कारागृहात आहेत. अक्षय म्हस्के याच्या खुनाच्या प्रयत्नात पोलिसांनी कृष्णा आंदेकर, स्वराज व तुषार वाडेकर या तिघांना अटक करून त्याच्या घराची झडती घेतली. त्यांना रविवारी न्यायालयातून नंदूरबार तसेच धुळे कारागृहात परत नेण्यासाठी पोलिस जात असताना त्यांचा पाठलाग करण्यात आला.
…असा आला प्रकार उघडकीस
न्यायालयातून चाकणमार्गे या तिघांना पोलिस व्हॅनमधून नंदूरबार तसेच धुळे कारागृहात सोडण्यासाठी नेण्यात येत होते. तेव्हा शिवाजीनगर कोर्टापासून पोलिस व्हॅनचा वेदांत आणि अथर्व या दोघांनी दुचाकीवर पाठलाग सुरू केला. पोलिस गाडी चाकणपर्यंत गेल्यानंतर एक दुचाकी सतत पाठलाग करत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी दुचाकी अडवली. मात्र, दोघेही दुचाकी सोडून पसार झाले, नंतर त्याचा शोध घेऊन या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीतून सुरज ठोंबरेचे नाव समोर
गुन्हे शाखेने वेदांत आणि अथर्व यांचा शोध घेऊन त्यांना कात्रज परिसरातून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे दोघेही रेकी करत असल्याचे दिसून आले. सातत्याने पोलिस गाडीची माहिती दोघे सुरज ठोंबरे याला देत असल्याचे दिसून आले. पोलिस गाडीसोबत पोलिसांचा ताफा, गाडीची ठिकाण याबाबत माहिती फोनवरून देत होते. या दोघांकडेही पिस्तूल असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे.
कोण आहे सुरज ठोंबरे?
आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी म्हणून सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरे या दोघांची नावे पोलिसांकडे आहेत. दोघे पक्के मित्र तर आहेतच, पण ही टोळी देखील दोघे चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरज ठोंबरेला सध्या एका गुन्ह्यात हाय कोर्टाने पुणे जिल्ह्यात बंदी येण्यास बंदी केलेली आहे. त्यामुळे तो सातारा जिल्ह्यात राहत असल्याचे सांगितले जाते. पण, सातत्याने आंदेकरांकडून वनराजच्या खुनाचा बदला म्हणून आरोपीमधील नातेवाईक व भाऊ यांच्यावर हल्ले व खून केले जात आहेत. यापार्श्वभूमीवर गायकवाड-ठोबरे टोळीकडूनही प्रति हल्ला होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.






