साक्षी गांधी साकारणार इंदुराणी पाटरासरकर
मराठी मालिका आणि झी मराठी हे खरंतर एक वेगळेच समीकरण आहे. गावातला बाज परफेक्ट ओळखून आणि प्रेक्षकांना नक्की काय पहायला आवडतं हे ओळखून अनेक मराठी मालिका आणल्या जातात आणि आता अजून एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे ती म्हणजे ‘कृष्णाईच्या लेकी’. पुन्हा एकदा निवेदिता सराफ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण त्यांच्या बरोबरीने या मालिकेत अजून एक अशी व्यक्तिरेखा असणार आहे ती म्हणजे ‘इंदुराणी पाटरासकर’ आणि ही भूमिका साकारणार आहे साक्षी गांधी. याच निमित्ताने साक्षीने अगदी मनसोक्तपणे ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारल्या.
‘ही भूमिका कशी मिळाली आणि नकारात्मक भूमिका स्वीकारताना तुला भीती वाटली नाही का? वयापेक्षा थोडी मोठी दिसणारी भूमिका आहे असा मनात विचार आला का?’ यावर साक्षी सहज म्हणाली की, ‘या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी खरंतर ४ महिने फिरतीवर होते आणि जेव्हा भूमिका कळली की, माझ्या व्यक्तिरेखेचे नाव इंदुराणी पाटरासकर आहे. इंदुराणी ही जनार्धनची दुसरी पत्नी आणि कृष्णाईची सवत आहे. तिचे लग्न खूप लहान वयात, अवघ्या १७ व्या वर्षी झाले. त्यामुळे आधी मनात पाल चुकचुकली होती. पहिली ऑडिशन तर मी नर्मदा परिक्रमाला गेले होते तिथूनच दिली. त्यानंतर पुन्हा ऑडिशनचा कॉल आला तेव्हा मी गिरनारला होते. पण मला वाटतं खरंच माझी निवड झाली ही नर्मदा आणि दत्तगुरुंचीच कृपा असेल.’
पुढे साक्षी असंही म्हणाली की, ‘पहिल्यांदा तर ही भूमिका ऐकून मी नकारच दिला होता. काही मित्रमैत्रिणींचं ऐकून मला वाटलं कदाचित ही भूमिका माझ्यासाठी योग्य नाही. मला खरंतर नकारात्मक भूमिका करायला आवडते कारण अभिनयाला जास्त वाव असतो. बऱ्याच शेड्स असतात. पण अशी भूमिका परत मिळणार नाही यावर पुन्हा आई-बहिणीशी चर्चा केली आणि मग होकार दिला. जे पदरी आलंय त्याचा स्वीकार कर हे आईचं ऐकलं आणि आता प्रेक्षकांसमोर येते आहे’
निवेदिता सराफ यांच्यासारख्या मोठ्या कलाकारासह काम करायला मिळण्याचं दडपण होतं का? अनुभव कसा आहे? साक्षीने एक मोठा उसासा सोडला, म्हणाली, ‘मला तर पहिले खरंच दडपण आलं होतं आणि का नाही येणार? निवेदिता सराफ यांचं काम आणि नाव इतकं मोठं आहे. मी खूप लहानपणी त्यांच्यासह काम केलं होतं. आपलं काही चुकलं तर त्या काय म्हणतील असे अनेक विचार होते. पण पहिल्याच भेटीत त्यांनी मला ओळखलं आणि खूप सांभाळून घेतलं आणि मैत्रीणीसारखं वागवतात त्या त्यामुळे आता अजिबात भीती राहिली नाही. त्यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळतंय आणि मला खूप मज्जा येत आहे.’
या भूमिकेसाठी काही खास तयारी केलीस का? यावर साक्षीने सांगितले की, ‘लुक टेस्ट झाल्यावर आम्ही वर्कशॉप केले आणि त्यामध्ये इंदुराणी ही अशी व्यक्तिरेखा आहे जी अगदी पुढच्या क्षणाला कसे वागेल कळणार नाही हे मला समजले. त्यामुळे या भूमिकेची भाषा आणि बोलण्याची शैली माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे आणि त्यावर सर्वाधिक काम केले. ही जबाबदारी अधिक मोठी वाटत होती. इंदुराणीची चाल, तिची देहबोली, बोलण्याची पद्धत यावर खूप काम केलं. अगदी तिची चाल कशी असावी यावरदेखील वर्कशॉप केले. आमचे दिग्दर्शक अनिकेत सर यांनी प्रत्येक टप्प्यावर खूप मदत केली. ग्रामीण भाषा, बोलण्याचा बाज, टेचात आणि ठसक्यात बोलणं हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं त्यामुळे यावर खूप काम केलंय’
प्रेक्षकांना तर अपेक्षा असतातच पण तुला काय अपेक्षा आहेत प्रेक्षकांंकडून? साक्षी अगदी मनापासून म्हणाली की, ‘मला पहिल्या भूमिकेपासूनच प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम दिलंय आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. ‘कृष्णाईच्या लेकी’च्या प्रोमोना प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मालिकेबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या..बाकी मनोरंजन तर मी करत राहीनच!’
साक्षीचा प्रोमोही नुकताच प्रदर्शित झाला असून तिला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. लवकरच तिचे कामही प्रेक्षकांसमोर येणार असून तिचे काम सर्वांना आवडेल अशी तिची अपेक्षा आहे.






