Bankipur By-election : भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांची मुसंडी; बांकीपूर पोटनिवडणुकीत मोठी आघाडी
बिहारच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या 15व्या फेरीनंतर ते भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांच्यापेक्षा 8,202 मतांनी पुढे असल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालामुळे भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतमोजणीदरम्यान उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपचे नीरज सिन्हा 21,550 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत, तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)च्या रेखा गुप्ता यांना आतापर्यंत 6,755 मते मिळाली असून त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. सुरुवातीपासूनच जनसुराजने आघाडी कायम ठेवली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आघाडी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी आत्मविश्वास व्यक्त करत, “विजय आधीच निश्चित झाला आहे,” असे म्हटले. त्यांच्या या विधानानंतर जनसुराजच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला असून सोशल मीडियावरही प्रशांत किशोर आणि जनसुराज ट्रेंड होत आहेत. विशेष म्हणजे, कायस्थ समाजाचे वर्चस्व असलेल्या भागांमध्येही भाजपला मोठी पिछाडी असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिमबहुल भागांतील मतमोजणी अद्याप सुरू असल्याने अंतिम निकालाबाबत उत्सुकता कायम आहे.
या पोटनिवडणुकीसाठी 14 टेबलांवर 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू असून संपूर्ण प्रक्रियेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ड्रोनच्या सहाय्याने मतमोजणी केंद्रावर सतत देखरेख ठेवली जात आहे. या निवडणुकीत प्रशांत किशोर, भाजपचे नीरज सिन्हा आणि आरजेडीच्या रेखा गुप्ता यांच्यासह एकूण 25 उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, निकालाच्या कलांवरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. भाजप पिछाडीवर असल्याच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा निकाल जनतेच्या निर्णयाचा विजय असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, बांकीपूरमधून मिळणारा संदेश आगामी बिहारच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकतो.
बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा मजबूत गड मानला जातो. 1995 पासून या जागेवर भाजपने सातत्याने विजय मिळवला आहे. प्रथम नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित न राहता बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.






