Maharashtra Breaking News Updates Today
04 Jun 2026 10:30 AM (IST)
पुणे जिल्ह्यातून दुहेरी हत्येचे प्रकरण समोर आले आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून त्याने आपल्या वडिलांची आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील परिसरात बगाडवाडी येथील आहे.
04 Jun 2026 10:20 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या इराणवर हल्ल्याविरोधात अमेरिकन संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संसदेच्या परवानगिशिवाय इराणवर सैन्य कारवाई करण्यापासून ट्रम्प यांना रोखण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांनीच पाठ फिरवली आहे
04 Jun 2026 10:10 AM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. 4 जून 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात.आपल्या अचूक विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आजही चाहत्यांचे लाडके आहेत.मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन आणि आदर्श जोडी म्हणून अशोक व निवदेता सराफ यांच्याकडे पाहिले जाते.
04 Jun 2026 09:40 AM (IST)
Nashik TCS Case Nida Khan: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) चे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) मतीन पटेल यांची पुन्हा एकदा कसून चौकशी केली आहे.
गुन्हेगाराला आश्रय दिल्याने चौकशीचा फेरा मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी निदा खान हिला पाठीशी घातल्याच्या आणि आश्रय दिल्याचा संशय मतीन पटेल यांच्यावर आहे. यापूर्वीही एसआयटी पथकाने त्यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली होती.
04 Jun 2026 09:30 AM (IST)
Nashik Vidhan Parishad Election आगामी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) रिंगणात महायुतीसमोर निर्माण झालेला बंडखोरीचा मोठा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
२४ तासांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर बंड थंड नाशिकमधील या बंडखोरीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे संकट उभे राहिले होते. हा वाद मिटवण्यासाठी गेल्या २४ तासांपासून मुंबईत मॅरेथॉन बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांची मनधरणी करण्यात यश मिळवले असून, पक्षाची शिस्त आणि महायुतीचा धर्म पाळत गणेश गीते यांनी माघार घेण्यास संमती दिली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
04 Jun 2026 09:23 AM (IST)
Muzaffarpur Prasad Hospital Fire बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. येथील ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आगीत होरपळल्याने आणि वॉर्डमध्ये पसरलेल्या धुरामुळे दम कोंडल्याने ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच संपूर्ण वॉर्डला आगीने वेढले आणि तिथे काळोख व धूर पसरला. आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कसाबसा जीव वाचवत बाहेर धाव घेतली
04 Jun 2026 09:11 AM (IST)
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं?
पूजा प्रमोद सुरवसे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पूजा ही मूळची परभणी येथील रहिवासी. वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी तीच लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. मात्र काही दिवसांनंतर व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे पूजाने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. याच छळाला कंटाळून पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींपैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही. अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरूनच ती केवायसी केलेली नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा ही केवायसी पडताळणी केली जाईल, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.






