जायकवाडीची जलपातळी घटल्याने संभाजीनगरच्या २७४० कोटींच्या नवीन पाणी योजनेला मोठा झटका
केंद्र सरकारच्या अमृत-२ अभियानांतर्गत सुमारे २ हजार ७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना उभारण्यात येत आहे. या योजनेतील मुख्य जलवाहिनी आणि पाणीउपसा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी धरणातील घटत्या जलपातळीमुळे पाणी उचलण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. सध्या परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सायफन पाइपची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
नवीन योजनेसाठी जायकवाडी धरणातील जॅकवेलमध्ये सायफन प्रणालीद्वारे पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील जलपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने या व्यवस्थेची कार्यक्षमता कमी होत आहे. जलपातळी खाली गेल्यामुळे पाइपलाइनमध्ये हवेचे बुडबुडे तयार होत असून पंपांना आवश्यक दाब मिळत नाही. परिणामी पाणीउपसा खंडित होत असून जॅकवेलमार्गे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
सायफन पाइपची लांबी वाढविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जॅकवेलमध्ये पुन्हा सुरळीत पाणी आणण्याचा प्रयत केला जाणार आहे. ही उपाययोजना तात्पुरती असल तरी वाढीव पाणीपुरवठ्याचे नियोजन वेळेत सुख्ख ठेवण्यासाठी ती आवश्यक मानली जात आहे.
जायकवाडीतील जलपातळी सातत्याने कमी होत असल्याने सायफन प्रणालीवर अवलंबून राहणणे दीर्घकालीन दृष्टिकोनातून व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धरणात फ्लोटिंग पंप् बसविण्याच्या विचार सुरू आहे. त्यामुळे जॅकवेलल सातत्याने पाणीपुरवठा करता येऊ शकतो.
नवीन योजनेद्वारे सध्या दररोज २० ते २५ एमएलडी पाणी उचलले जात आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणीउपशातील तांत्रिक अडचणी वाढल्याने नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा पुरवठा प्रभावित झाला आहे. शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असताना निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
अमृत-२ योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसाठी नवीन पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माहितीनुसार योजनेची सुमारे ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मुख्य जलवाहिन्या आणि पाणी वाहतुकीची यंत्रणा उभारण्यात आली असली तरी अनेक भागातील वितरण नेटवर्क आणि जलकुंभांची कामे अद्याप सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात शहरासाठी २०० एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.






