मुंबई – एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटांत विभागली गेली. एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जातात. तर अनेकदा खुली आव्हानंही देण्यात आली आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलेल्या एका आव्हानाची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरेंनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवा, असं खुलं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही
आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्यासाठी आव्हान दिलं आहे. मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे. जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.
राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच
आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो.”