मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नाही. यावरून शिरसाट यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे. हाच धागा पकडत विरोधकांनी आज विधानसभेत संजय शिरसाट यांना ‘चला काही तरी मिळाले’ असा टोला लगावला.
विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्र सकाळी ९. वाजता सुरू झाले. यावेळी तालिका अध्यक्ष संजय शिरसाट पीठासीन अधिकारी म्हणून आसनस्थ झाले. यावेळी सभागृहात केवळ १६ आमदार उपस्थित होते. संजय शिरसाट यांनी सभागृहात एक नजर फिरविली आणि कामकाज सुरु करण्यापूर्वी सदस्यांना रामराम केला. त्यांचा हसरा चेहरा पाहून विरोधी पक्षाकडून मंत्री पद नाही मिळाले. पण, सभागृह चालविण्याचा अधिकार मिळाला. ‘चला काही तरी मिळाले’ असा टोला लगावला.
विरोधकांकडून आलेला हा टोला तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी हसत स्वीकारला. चला आता कामकाज सुरू करू म्हणत त्यांनी पहिली लक्षवेधी सूचना पुकारली. त्यांच्या म्हणण्याला विरोधकांनी दाद देत हसतखेळत विशेष सत्राचे कामकाज पूर्ण केले. या विशेष सत्रात आमदारांनी विचारलेल्या ८ पैकी ६ लक्षवेधी सूचनांना मंत्र्यानी उत्तर देत सदस्यांचे समाधान केले.






