
Maharashtra Breaking News Today
29 Aug 2026 11:15 AM (IST)
भारतातील तरुणांसाठी रोजगाराची समस्या ही केवळ आपल्या पसंतीची नोकरी मिळवण्यापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या संख्येने तरुणांमध्ये पुरेशा नोकऱ्या उपलब्ध नसणे ही आहे. अलीकडेच समोर आलेल्या ऑगस्ट २०२६ मधील एका सर्व्हेच्या अहवालात ३२ टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, तरुणांसमोर रोजगाराची सर्वात मोठी समस्या म्हणजे पुरेशा नोकऱ्या उपलब्ध नसणे. यानंतर १८ टक्के लोकांनी कमी वेतनाला मोठी अडचण असल्याचे सांगितले.
सर्व्हेमध्ये प्रत्येकी १७ टक्के लोकांनी असे सांगितले की, नोकऱ्या त्यांच्या पात्रतेनुसार नाहीत आणि सरकारी भरती खूप गतीने होते. तर ७ टक्के लोकांच्या मते शिक्षणामुळे तरुणांना नियोक्त्यांच्या गरजेनुसार कौशल्य मिळत नाही. केवळ चार टक्के लोकांच्या मते सुरक्षित नोकरी आणि सुविधांचा अभाव ही सर्वात मोठी समस्या आहे.
29 Aug 2026 11:06 AM (IST)
पुण्यातील भोर तालुक्यात दिवसाढवळा भररस्त्यात व्यक्तीच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार दिसला. बायको आणि मुलासोबत रस्ता ओलांडताना व्यक्तीवर मागून हल्ला करण्यात आला. आरोपीने चाकूने सपासप वार करुन बायको-मुलाच्या समक्षच व्यक्तीचा खून केला. मुख्य म्हणजे घटनेवेळी एक बाईक तिथून जात होती. बाईक थांबली, बाईकस्वाराने व्यक्ती जखमी असल्याचेही पाहिले पण तरीही मदतीसाठी तो पुढे आला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यात हत्येचे संपूर्ण फुटेज दिसून येते.
29 Aug 2026 10:55 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथून आंदोलनाला आजपासून (२९ ऑगस्ट) सुरुवात करत त्यांनी आरक्षणासंबंधी मागण्यांची संपूर्ण अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत जाऊन ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर धडक देण्याचाही इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
जरांगे-पाटील यांनी सरकारवर मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. आता मागण्या प्रत्यक्षात मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज संघर्ष केला तर त्याचा फायदा मराठा समाजाच्या पुढच्या पिढ्यांना होईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
29 Aug 2026 10:45 AM (IST)
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी सुविधांच्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते योगेश पवार यांच्या मागणीनुसार आमदार शेखर निकम यांनी या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून, नगरपरिषद प्रशासनानेही अंदाजपत्रके तयार करण्यासह आवश्यक कार्यालयीन प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे निधी प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतर प्रभागातील रस्ते, गटारे, संरक्षक भिंती, घाट आणि क्रीडांगण अशा विविध पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
29 Aug 2026 10:35 AM (IST)
राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जातो. हा दिवस हॉकीच्या महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे महानायक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे योगदान भारतीय क्रीडा क्षेत्राला अमूल्य आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
29 Aug 2026 10:25 AM (IST)
Lecturer Neha Murder Case: पंजाबमधील जालंधर येथे गाजलेल्या लेक्चरर नेहा हत्याकांड प्रकरणी पोलिसांच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा कसून तपास करत असताना पोलिसांच्या हाती मुख्य आरोपी (नेहाचा पती) उमंग बस्सी आणि त्याची मैत्रीण सतपाल यांच्यातील खासगी व्हॉट्सॲप संवाद लागला आहे.
तब्बल २०६ पानांच्या या व्हॉट्सॲप चॅटमधून केवळ त्यांच्या विवाहबाह्य संबंधांचीच माहिती समोर आलेली नाही, तर त्यांच्या गुप्त योजना, बैठका आणि लग्नाबद्दलचे धक्कादायक सत्य उघड झाले आहे. उमंग याची पत्नी आणि सतपाल हिचा नवरा हे दोघेही त्यांच्या नात्यातील मुख्य अडथळा ठरत असल्याने, त्या दोघांनाही संपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
29 Aug 2026 10:23 AM (IST)
स्मार्टफोन बाजारात ग्राहकांच्या पसंती झपाट्याने बदलत आहेत. लोक आता केवळ मेगापिक्सेल किंवा रॅमच्या आधारावर फोन खरेदी करत नाहीत. ॲमेझॉन इंडियाच्या ‘बेस्ट इन टेक सर्व्हे’ मधून एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार, ८२% ग्राहक आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर नवीन फोन घेण्याचा निर्णय घेत आहेत. जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ४० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. हे सर्वेक्षण स्पष्टपणे दर्शवते की एआय मोबाईल बाजारात गेम चेंजर ठरले आहेत. तथापि, लोक केवळ नावापुरते एआय नको, तर त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेल्या वैशिष्ट्यांची मागणी करत आहेत
29 Aug 2026 10:17 AM (IST)
टेक कंपनी हॉनरने हाँगकाँगमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Honor 600S 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी, ड्यूरेबल बिल्ड आणि अनेक दमदार एआय फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये लाँच केला आहे.
29 Aug 2026 10:15 AM (IST)
Manoj Jarange Patil Maratha Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे शेवटचे आणि निर्णायक आमरण उपोषण सुरू होत आहे. सकाळी १० वाजता ते उपोषण स्थळावर आंदोलनाला बसणार आहेत. ५८ लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे वाटप करणे आणि त्यांची पडताळणी तातडीने करणे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत.
29 Aug 2026 10:05 AM (IST)
Mumbai Milk Price Hike: साखर, कांदा आणि लसणाच्या वाढत्या दरांनंतर आता मुंबईकरांना दूध दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून १ सप्टेंबर २०२६ पासून नवीन दर लागू होणार आहेत. या निर्णयानुसार, सध्या मुंबईत प्रतिलिटर ९३ रुपये असलेला दुधाचा घाऊक दर आता १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. ही सुधारित दरवाढ १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहील. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रतिलिटर असताना आता दुधाचा दर १०२ रुपये झाल्याने पेट्रोल आणि दुधाचे दर जवळपास एकाच पातळीवर आले आहेत.
29 Aug 2026 09:50 AM (IST)
मध्य प्रदेशच्या रीवा शहरातील मेमोरीअल रुग्णालयात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, प्रसूतीआधी महिलेचा आधीच रुग्णालयात आक्रोश सुरु होता. मृत्यूनंतर संतापलेल्या कुटुंबाने रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले आणि वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप लावत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरणाची गंभीरता पाहता रुग्णालयाने दोन नर्सिंग अधिकाऱ्यांना निलंबित केलं असून या प्रकरणात चाैकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
29 Aug 2026 09:45 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रातील मान्सूनची सक्रियता काहीशी कमी झाली असली तरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १६ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडेलच असे नाही. स्थानिक हवामान परिस्थितीनुसार, काही भागांतच पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. चंद्रपूरच्या सिंदेवाही आणि जळगावच्या भडगाव येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात पावसाचे वितरण अद्याप असमान असल्याचे दिसून येते. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असताना काही ठिकाणी अल्पावधीत जोरदार सरी कोसळत आहेत.
29 Aug 2026 09:40 AM (IST)
नवी दिल्ली : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची चर्चा होते, तेव्हा मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि टाटा ग्रुप यांची नावे अनेकदा समोर येतात. मात्र, जमिनीचा विषय येतो तेव्हा चित्र वेगळे दिसते. एका अहवालानुसार, भारत सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्याकडे एकूण १५५३१ चौरस किलोमीटर जमीन आहे. हे क्षेत्र दिल्लीच्या एकूण क्षेत्राच्या जवळपास १० पट आहे.सरकारी संस्थांमध्ये, संरक्षण मंत्रालय सर्वांत मोठ्या जमीनदारांपैकी एक आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या जात पडताळणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नेपाळ आणि चीन सीमेवरील भीषण ढगफुटीमुळे मृतांचा आकडा ५७० पार गेला असून, महाराष्ट्रातील अडकलेल्या ४०४ पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आयटी (IT) क्षेत्रातील तेजीच्या बळावर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.
रिझर्व्ह बँकेने एफसीएनआर (FCNR-B) डॉलर-रुपया स्वॅप सुविधेचे नियम शिथिल करून विदेशी चलन गंगाजळीला मोठा दिलासा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आगामी महत्त्वाच्या मालिकेसाठी सराव शिबिराला सुरुवात केली असून क्रीडा क्षेत्रात नवीन संघ निवडीची चर्चा रंगली आहे. इराणी चलनाची (Rial) प्रचंड घसरण झाल्यामुळे मध्यपूर्वेतील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.