अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू
अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांतील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, सध्या जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांमध्ये एकूण ५२७.८२ दलघमी म्हणजेच ५०.४१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठे अपर वर्धा धरण अद्यापही समाधानकारक भरलेले नसून त्यासाठी मध्य प्रदेशातील कॅचमेंट क्षेत्रात दमदार पावसाची आवश्यकता आहे. या भागात पाऊस कमी झाल्याने धरणातील जलसाठा अपेक्षित वेगाने वाढत नसल्याचे चित्र आहे.(फोटो सौजन्य – istock)
Amravati News: अमरावतीच्या विकासाला नवी गती! बेलोरा विमानतळ ठरणार विदर्भातील नवे एव्हिएशन हब
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंभोरा (अपर वर्धा) धरणाची जलपातळी सध्या ३३९.२२ मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणाची एकूण जलसाठवण क्षमता ५६४.०५ एमसीएम असून, त्यापैकी ३०८.०७ दलघमी (५४.६२ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. १ जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ४७० मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यातील सात मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ४५.४५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. यामध्ये चंद्रभागा धरण सर्वाधिक ८२.२६ टक्के जलसाठ्यासह आघाडीवर असून, पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे ५ सेंमीने उघडण्यात आले. येथून १४.४३ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पूर्णा धरणात ७५.६७ टक्के जलसाठा असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन दरवाजे १० सेंमीने उघडून १५.८८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय साठा धरणात ५२.४९ टक्के, शहानूरमध्ये ४८.०५ टक्के, पांढरीमध्ये २१.४९ टक्के, बोर्डीनाला येथे १.७२ टक्के, तर गडगा धरणात उपयुक्त जलसाठा अद्याप शून्य आहे. जिल्ह्यातील ४८ लघु सिंचन प्रकल्पांमध्ये १०३.१३ एमसीएम म्हणजेच ४५.४६ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.
Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी, तलाव, धरणे ओसंडून वाहत आहेत. सातत्यपूर्ण पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील एकूण ५६ जलप्रकल्पांमध्ये ५२७.८२ दलघमी (दशलक्ष घनमीटर) म्हणजेच ५०.४१ टक्के उपयुक्त जलसाठा झाल्यामुळे येणाऱ्या पुढील काळात पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी मोठा दिलासा आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे अपर वर्धा धरण अपेक्षे एवढे भरलेले नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.






