मी गेल्यानंतर आईची काळजी घे...' कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्यानंतर या वडिलांनी आपल्या लहान मुलाला जवळ बसवून आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांनी मुलाला आईचा आदर करण्याचा, तिचे ऐकण्याचा आणि कधीही हट्टीपणा किंवा गैरवर्तन न करण्याचा सल्ला दिला.
व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलाला सांगतात की, त्यांच्या अनुपस्थितीत आईची काळजी घेण्याची जबाबदारी आता त्याच्यावर असेल. त्याचबरोबर आपल्या दोन लहान बहिणींचीही काळजी घ्यावी, त्यांचे संरक्षण करावे आणि घरातील जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, असेही ते प्रेमाने सांगतात.
संवादादरम्यान मुलगा भावूक होत असल्याचे दिसते. त्यावेळी वडील त्याला धीर देत म्हणतात, “रडायचं नाही, तू खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहेस.” तसेच कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीर राहण्याचे आश्वासनही ते मुलाकडून घेतात.
मुलाच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वडील त्याला सांगतात की, “जर तुला माझी आठवण आली, तर समज मी तुझ्याजवळच आहे. मी नेहमी तुझ्याकडे लक्ष ठेवीन आणि तुझ्यासोबत असेन.” या शब्दांनी त्यांनी मुलाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकांनी तो पाहून भावना व्यक्त केल्या आहेत. कमेंट्समध्ये अनेक जण वडिलांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहत आहेत, तर मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाला धैर्य मिळावे, अशी प्रार्थना करत आहेत. पालकांचे प्रेम, त्याग आणि मुलांच्या भविष्यासाठीची काळजी किती निःस्वार्थ असते, याची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.






