'हे हिंसेसाठी नाही…' इराणवरील हल्ल्यांच्या व्हिडिओमधील ‘फायरवर्क’ या गाण्यामुळे कॅटी पेरी संतप्त; ट्रम्प प्रशासनाला घेरले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक मनोरंजन जगतात आणि अमेरिकन राजकारणात सध्या एका नव्या वादाने पेट घेतला आहे. प्रसिद्ध अमेरिकन पॉप स्टार आणि गीतकार कॅटी पेरी (Katy Perry) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून इराणवर झालेल्या लष्करी हल्ल्यांचे फुटेज दाखवणाऱ्या एका व्हिडिओमध्ये कॅटी पेरीचे अत्यंत लोकप्रिय ठरलेले ‘फायरवर्क’ (Firework) हे गाणे पार्श्वसंगीत (Backing Track) म्हणून वापरण्यात आले. या प्रकारामुळे अत्यंत व्यथित झालेल्या कॅटी पेरीने व्हाईट हाऊसवर आपली स्पष्ट नाराजी व्यक्त करत, तिच्या परवानगीशिवाय गाण्याचा राजकीय व लष्करी कारणांसाठी वापर केल्याचा आरोप केला आहे.
हा संपूर्ण वाद तेव्हा समोर आला जेव्हा व्हाईट हाऊसच्या अधिकृत टिकटॉक (TikTok) खात्यावरून सुमारे ९ सेकंदांची एक अनक्लॅसिफाईड व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्यात आली. या व्हिडिओमध्ये इराणमधील लष्करी तळांवर आणि बंदरांवर अमेरिकन सैन्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची व स्फोटांची भीषण दृश्ये दाखवण्यात आली होती. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर कॅटी पेरीच्या २०१० मधील जगप्रसिद्ध ‘फायरवर्क’ गाण्यातील “Boom, boom, boom, even brighter than the moon” या ओळी वाजत होत्या. विशेष म्हणजे, गाण्यातील ‘बूम बूम’ या शब्दांच्या तालावर बॉम्बस्फोतांचे दृश्य दाखवून “इराणला इशारा देण्यात आला आहे” (Iran has been warned) असे कॅप्शन व्हिडिओला दिले गेले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MEA Advisories: Black Seaमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांनी तांडव; 5 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून मोठी ऍक्शन
व्हाईट हाऊसचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच कॅटी पेरीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X – पूर्वश्रमीचे ट्विटर) एक सविस्तर निवेदन जारी करून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. तिने लिहिले, “व्हाईट हाऊसच्या टिकटॉक खात्यावर लष्करी हल्ल्यांच्या व्हिडिओमागे माझे ‘फायरवर्क’ गाणे वापरलेले पाहून मला प्रचंड धक्का बसला आहे आणि माझा संताप अनावर झाला आहे. मी यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी दिली नव्हती, मला याबद्दल विचारलेही गेले नव्हते आणि मी अशा प्रकारच्या कोणत्याही हिंसेचे समर्थन मुळीच करत नाही.”
कॅटी पेरीने तिच्या या गाण्यामागील मूळ उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “मी हे गाणे लोकांमधील नैराश्य दूर करण्यासाठी, त्यांना कठीण प्रसंगात स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी, आशा आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी लिहिले होते. आत्मसन्मान आणि आशेचा संदेश देणाऱ्या गाण्याला अशा प्रकारे विनाश, हिंसा आणि युद्धाच्या प्रचाराचे साधन बनवणे हा या गाण्याच्या आत्म्याचा थेट अपमान आहे. माझे संगीत लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि जोडण्यासाठी आहे, युद्धाचा आणि विनाशाचा उत्सव साजरा करण्यासाठी नाही.”
कॅटी पेरीने नेहमीच शांतता, मानवाधिकार आणि सामाजिक मूल्यांचा पुरस्कार केला आहे. जानेवारी २०२१ मध्ये जेव्हा जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती, तेव्हा वॉशिंग्टनमधील ऐतिहासिक लिंकन मेमोरियलसमोर कॅटी पेरीने हेच ‘फायरवर्क’ गाणे सादर करून देशाला आशेचा संदेश दिला होता. त्यामुळे शांतता आणि आशेचे प्रतीक बनलेल्या या गाण्याचा वापर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून लष्करी ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी केला गेल्याने कॅटी पेरी कमालीची दुखावली गेली आहे.
I am deeply appalled and angry to see “Firework” used on the @WhiteHouse TikTok account as a backing track for video footage of military strikes. I did not approve this, I was not asked, and I absolutely do not condone it. I wrote this song to be an anthem of hope, healing, and… — KATY PERRY (@katyperry) July 25, 2026
credit – social media and Twitter
इराण आणि अमेरिका यांच्यात आधीच युद्धाचे ढग दाटले असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या लष्करी धोरणांवर जगभरातून टीका होत आहे. अशा वेळी पॉप संस्कृतीतील गाण्यांचा वापर करून युद्धाचे उदात्तीकरण करण्याच्या व्हाईट हाऊसच्या प्रयत्नांवर मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh News: पाकिस्तानचे तुकडे तुकडे! सिंधच्या MQM-P कडून स्वतंत्र प्रांताची जोरदार मागणी; कराची-हैदराबादमध्ये जोरदार प्रोटेस्ट
राजकीय किंवा लष्करी प्रचारासाठी कलाकारांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांची गाणी वापरण्याची ट्रम्प प्रशासनाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक नामवंत गायकांनी ट्रम्प आणि त्यांच्या टीमवर कॉपीराईट उल्लंघन आणि वैचारिक विरोधावरून कडक टीका केली आहे.
जरी ट्रम्प प्रशासनाकडून किंवा व्हाईट हाऊसकडून कॅटी पेरीच्या या टीकेवर अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले, तरीही या घटनेने बौद्धिक संपदा अधिकार (Copyright Laws) आणि संगीताचा राजकीय/लष्करी वापर यावरील आंतरराष्ट्रीय चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.






