(फोटो सौजन्य: Pinterest)
Virat Kohli Instagram Earning : क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्याने आतापर्यंत गाजवलेल्या मैदानांवरील त्याची कामगिरी पाहता कोणीही तो काय आहे त्याचा अंदाज येईल. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत आणि सोशल मीडियावर त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. विराट कोहली जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव घेतलं जातं. सध्या, इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या २७४ दशलक्ष इतकी आहे. त्यामुळे त्याचं फॅनफॉलोईंग इतकं तगडं आहे की त्याला कोणत्या सुपरस्टारपेक्षा कमी प्रेम मिळत नाही. याच सोशल मीडियाच्या बळावर विराट एका पोस्टमागे कोट्यवधी कमवतो. नेमका काय आहे आकडा? जाणून घेऊयात.
नुकतेच, ‘कंटेंट क्रिएटर’ आणि व्यावसायिक तज्ज्ञ अंकुर वारिकूने विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील कमाईबाबत एक मोठा खुलासा केला आहे. याव्यतिरिक्त, विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टमधून जेवढी कमाई करतो, तेवढीच कमाई करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांना किती कालावधी लागेल, हे देखील त्यांनी यात स्पष्ट केलं आहे.
फेसबुकवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये, अंकुरने हा खुलासा केला आहे की, विराट कोहली इन्स्टाग्रामवरील केवळ एका ‘स्पॉन्सर्ड’ पोस्टमधून अंदाजे १२ ते १४ कोटी रुपये कमावतो. या बाबतीत, तो केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही अव्वल दर्जाच्या सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या पंक्तीत गणला जातो. आपल्या पोस्टमध्ये अंकुरने स्पष्ट केलं की, “विराट कोहली इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी १२ कोटी रुपये आकारतो. जर तुम्ही दरमहा १० लाख रुपये कमावत असाल, तर ही रक्कम कमावण्यासाठी तुम्हाला १० वर्षे लागतील. जर तुम्ही ५ लाख रुपये कमावत असाल, तर तुम्हाला २० वर्षे लागतील. आणि जर तुम्ही दरमहा १ लाख रुपये कमावत असाल, तर एवढी मोठी रक्कम कमावण्यासाठी तुम्हाला १०० वर्षे लागतील.” या मांडणीतून सामान्य माणसाला हा आकडा गाठणं किती कठीण आहे, तोच आकडा विराट कोहली एकावेळी कमवतो हे स्पष्ट केलं.
जागतिक पातळीवर, इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा समावेश होतो; या यादीत तो केवळ ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याच मागे आहे. कोहलीकडे उत्पन्नाचे इतरही अनेक स्रोत आहेत जसं की BCCI च्या ‘A+’ श्रेणीतील करारांतर्गत, त्याला दरवर्षी ₹७ कोटींचा निश्चित पगार मिळतो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासोबतच्या प्रत्येक हंगामातून तो ₹१५ कोटींहून अधिक कमाई करतो. तसेच, तो PUMA, MRF आणि Audi यांसारख्या ब्रँड्सचेही endorsement करतो. याव्यतिरिक्त, ‘One8’ आणि ‘Wrogn’ हे त्याचे स्वतःचे lifestyle ब्रँड्सही आहेत.






