(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Tumbadchi Manjula OTT Release: यंदाच्या वर्षातील गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरलेला ‘तुंबाडची मंजुळा’ आता घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटगृहात प्रेक्षक आणि समीक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवल्यानंतर या चित्रपटाचा ७ ऑगस्ट रोजी मराठी ZEE5 वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.
दिग्दर्शक विविध कोरगावकर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि झी स्टुडिओच्या निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटातील केशव हे पात्र स्वतःला मंजुळा नावाच्या महिलेच्या आत्म्याने झपाटल्याचं खोटं सांगतो. त्यानंतर गावभर सुरू होतो गोंधळ, अफवा, अंधश्रद्धा आणि अनपेक्षित घटनांचा सिलसिला. विनोद, रहस्य, भय आणि भावनिक प्रसंगांचा सुरेख मेळ साधत हा चित्रपट अंधविश्वास, सामाजिक पूर्वग्रह आणि मानवतेचा संदेश देतो.
२०२६ मधील गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरलेल्या या सिनेमात भय, विनोद आणि भावनिक कथानकाचा उत्तम संगम पाहायला मिळतो. दमदार कलाकारांचा अभिनय आणि वेगळा विषय यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
कलाकारांनी व्यक्त केला आनंद
दिग्दर्शक विविध कोरगावकर म्हणाले, “प्रेक्षकांचं मनोरंजन करतानाच समाजातील श्रद्धा आणि समजुतींवर भाष्य करणारा चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न होता. थिएटरमध्ये मिळालेलं प्रेम आता ZEE5 च्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, याचा आनंद आहे.”
जितेंद्र जोशी म्हणाले, “केशव हे पात्र एका छोट्या खोट्यामुळे मोठा गोंधळ निर्माण करतं. थिएटरमधील प्रतिसाद अविस्मरणीय होता. आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.”
तर सई ताम्हणकर म्हणाल्या, “‘तुंबाडची मंजुळा’मध्ये विनोद, भय आणि भावना यांचा सुंदर मिलाफ आहे. ही कथा मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडते. ZEE5 वर कुटुंबासोबत हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद मिळेल.”
भूत, गोंधळ, विनोद आणि भावनांनी भरलेला हा भन्नाट प्रवास अनुभवण्यासाठी ७ ऑगस्टपासून ‘तुंबाडची मंजुळा’ फक्त मराठी ZEE5 वर पाहता येणार आहे.






